पुणे/छत्रपती संभाजीनगर: पोलीसनामा
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील १ फेब्रुवारी हा दिवस अत्यंत क्लेशदायक तरीही त्यांच्या असीम धैर्याची साक्ष देणारा ठरला. आजच्याच दिवशी, म्हणजे १ फेब्रुवारी १६८९ रोजी, संगमेश्वर येथे मुघल सम्राट औरंगजेबाच्या सैन्याने कपटाने संभाजी महाराजांना आणि कवी कलश यांना कैद केले होते. या घटनेला आज अनेक वर्षे उलटली असली, तरी शंभूराजांनी दाखवलेला स्वराज्यभिमान आजही प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात सळसळत आहे.
संगमेश्वरचा तो ‘दगाफटका’
स्वराज्याला संपवण्यासाठी औरंगजेब पाच लाखांच्या फौजेनिशी दक्षिण मोहिमेवर आला होता. मात्र, शंभूराजांनी अवघ्या काही हजार मावळ्यांच्या मदतीने नऊ वर्षे मुघलांना सळो की पळो करून सोडले होते. १ फेब्रुवारी १६८९ रोजी संभाजी महाराज कोकणातील संगमेश्वर येथे काही मोजक्या सैनिकांसह असताना, मुकर्रब खान याने गुप्तहेरांच्या बातमीवरून वेढा घातला. स्वराज्याच्या या वाघाला जिवंत पकडण्यासाठी मुघलांनी मोठी फळी उभी केली होती.
मृत्यूच्या जबड्यात उभे राहून स्वाभिमान जपला
अटकेनंतर महाराजांना साखळदंडात जकडून औरंगजेबासमोर नेण्यात आले. औरंगजेबाने त्यांच्यासमोर अनेक अटी ठेवल्या—स्वराज्याचा खजिना द्यावा, किल्ले स्वाधीन करावेत आणि मुख्य म्हणजे धर्मांतर करावे. मात्र, “मरण पत्करेन पण धर्म आणि स्वराज्य सोडणार नाही,” असे ठणकावून सांगत शंभूराजांनी औरंगजेबाच्या सत्तेला लाथ मारली.
मुघल सत्तेचा अंत करणारा ठिणगीचा दिवस
१ फेब्रुवारी रोजी सुरू झालेला हा अटकेचा काळ पुढे ४० दिवस चालला. यादरम्यान औरंगजेबाने महाराजांचे अमानुष हाल केले, डोळे काढले, जीभ छाटली, तरीही शंभूराजे झुकले नाहीत. त्यांच्या या बलिदानाने अवघा महाराष्ट्र पेटून उठला आणि पुढे याच बलिदानामुळे मुघल साम्राज्याची कबर महाराष्ट्राच्या मातीत खोदली गेली.

आज १ फेब्रुवारी निमित्त गड-किल्ल्यांवर आणि शिवप्रेमींकडून संभाजी महाराजांच्या या अभेद्य शौर्याला अभिवादन केले जात आहे.













