करंजेपुलचा झंझावात! वडिलांचा गॅस-मिक्सर दुरुस्तीचा व्यवसाय, लेकाने खाजगी क्लासविना मारली पीएसआय पदाला गवसणी
सोमेश्वर पॅटर्न’ परत ठरला मोलाचा ✅
करंजेपुल/दौंड : दीपक धुवे पोलीसनामा पुणे
घरची परिस्थिती हलाखीची, वडील हातावरचे पोट भरण्यासाठी गॅस शेगडी आणि मिक्सर दुरुस्तीचे काम करतात. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर करंजेपुल येथील रमजान बाळाभाई शेख यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विभागीय पोलीस उपनिरीक्षक (PSI) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कोणत्याही खाजगी क्लासचा आधार न घेता रमजान यांनी राज्यात २८५ वी रँक मिळवत यशाला गवसणी घातली आहे.
रमजान शेख यांचे प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागात झाले असून त्यांनी बी.ए. (मराठी) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. २०१७ मध्ये त्यांची निवड राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्र. ७, दौंड येथे झाली होती. पोलीस दलात सेवा बजावत असतानाच त्यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. ४ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी खात्यांतर्गत पीएसआय परीक्षेचा मार्ग निवडला.
जिद्द आणि चिकाटीची यशोगाथा
२०२२ च्या परीक्षेत केवळ ५ गुणांनी हुलकावणी मिळाल्यानंतर रमजान खचून न जाता २०२३ च्या परीक्षेसाठी पुन्हा जोमाने कामाला लागले. त्यांनी ४०० पैकी ३६० गुण मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. विशेष म्हणजे, मैदानी चाचणीत १०० पैकी १०० गुण मिळवण्याचा पराक्रम त्यांनी केला, तर मुख्य परीक्षेत ३०० पैकी २६० गुण प्राप्त केले.
‘सेल्फ स्टडी’ आणि ‘सोमेश्वर पॅटर्न’ ठरला मोलाचा
आजच्या युगात लाखो रुपये खर्च करून कोचिंग लावले जाते, मात्र रमजान यांनी केवळ ‘सेल्फ स्टडी’वर भर दिला. विवेकानंद अभ्यासिकेमध्ये त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. या प्रवासात अभ्यासिकेचे संस्थापक गणेश सावंत यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. गणेश सावंत यांनी सुरू केलेला ‘सोमेश्वर पॅटर्न’ ग्रामीण भागातील मुलांसाठी यशाची गुरुकिल्ली ठरत आहे.
विवेकानंद अभ्यासिकेचा हा पहिला विद्यार्थी पोलीस भरती झाल्यानंतर काही वर्षातच पीएसआय झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रमजान शेख यांनी मिळवलेल्या या यशामुळे करंजेपुल गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.















