दिग्रसचा गौरव : सुनीलकुमार डोहरे यांना अमरावतीत प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ प्रदान; अध्यापन, तत्त्वज्ञान आणि योग विज्ञानातील कार्याचा बहुमान!
अमरावती : आदेश पाठक (पोलीसनामा ऑनलाईन )
अमरावती येथे संपन्न झालेल्या २४ व्या अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलनात यवतमाळ जिल्ह्याचे आणि विशेषतः दिग्रस शहराचे नाव राष्ट्रीय पातळीवर चमकले आहे. दिग्रस येथील रहिवासी असलेले श्री. सुनीलकुमार देवीदासजी डोहरे (जिल्हा समन्वयक, युवा प्रकोष्ठ, गायत्री परिवार, जिल्हा यवतमाळ) यांना त्यांच्या अध्यापन, तत्त्वज्ञान, संस्कृती संवर्धन आणि योग विज्ञान या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल अत्यंत मानाचा ‘राष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे.
‘संत चेतना महाकुंभ तथा प्रकृती-अध्यात्म समागम’ अंतर्गत अमरावती येथे या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
अदम्य क्षमता आणि राष्ट्र उभारणीला मानाचा मुजरा!
‘प्रतिभा-प्रेरणा परंपरा’ अंतर्गत देण्यात येणारा हा राष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार म्हणजे डोहरे यांच्या अदम्य क्षमता आणि कौशल्याचा मोठा सन्मान आहे. त्यांनी आपली सत्यनिष्ठा, कर्तव्यपरायणता, कर्मठता, दृढसंकल्प आणि समर्पण यांच्या बळावर समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. समृद्ध भारताची कला आणि संस्कृती जनमानसापर्यंत पोहोचवण्यासोबतच राष्ट्र उन्नती व समाज निर्मितीच्या कार्यात त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे, असे या गौरवपत्रात नमूद करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराची घोषणा आणि वितरण जागतिक कीर्तीच्या संस्थांच्या मान्यतेने करण्यात आले आहे. प्रदान करण्यात आलेल्या अधिकृत प्रमाणपत्रावर असा आहे खालील प्रमुख मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत:
ए. के. महाजन (अमरावती, महाराष्ट्र – संस्थापक तथा संपादक)
डॉ. पी. आर. रोकडे (छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र – निर्देशक तथा राष्ट्रीय परीक्षक)
डॉ. रुपाली वशिष्ठ (देहरादून, उत्तराखंड – निर्देशक तथा राष्ट्रीय परीक्षक)
ॲड. क्रांतदर्शी महाजन (अमरावती, महाराष्ट्र – संरक्षण/मार्गदर्शक)
जागतिक संस्थांचे पाठबळ (Global Recognition):
हा पुरस्कार सोहळा ‘वर्ल्ड ७ वंडर्स पब्लिकेशन’ (World 7 Wonder’s Publication), ‘रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड’ (Radiant Talent Book of Record) आणि ‘डब्ल्यूएसडब्ल्यूपी आयकॉनिक रेडियंट रेकॉर्ड वेल्फेअर फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. हा संपूर्ण उपक्रम भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (MCA), MSME आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत नोंदणीकृत आहे. १४ जून २०२६ (CLAIM ID: WSWP/RTBWR/AWARD/A-44) रोजी हा पुरस्कार अधिकृतपणे निर्गमित करण्यात आला आहे.














