कर्तृत्ववान महिलांचा ‘यशस्विनी सन्मान’ पुरस्काराने गौरव


कर्तृत्ववान महिलांचा ‘यशस्विनी सन्मान’ पुरस्काराने गौरव

पोलीसनामा मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने २२ जून १९९४ रोजी देशातील पहिले महिला धोरण जाहीर केले. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे धोरण महत्त्वाचे पाऊल ठरले. महिला धोरणाला यंदा ३२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कारांचे यंदा पाचवे वर्ष आहे. सामाजिक कार्य, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता आणि क्रीडा प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन सात महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

१७ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. महिलांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढल्याशिवाय सामाजिक परिवर्तन शक्य नाही. महिलांना समान अधिकार मिळाले पाहिजेत, जेणेकरून निर्णय प्रक्रियेत त्यांचा अधिकाधिक सहभाग वाढेल, असे मत सुप्रिया सुळे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. समाज अंधश्रद्धेकडे वळत असताना छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आणि आंबेडकर यांचा विचार मनात असणे गरजेचे आहे. हा विचार जिवंत असेल तर समाज बुवाबाजीमध्ये अडकणार नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले. तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी माणसाने स्वबुद्धीचा आणि विवेकाचा वापर केला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

पुरस्कारप्राप्त महिलांचे अभिनंदन करून सुप्रिया सुळे यांनी सन्मानित महिलांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या कामातून इतर महिलांसाठी कोणते उपक्रम सुरू करता येतील, याबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले. यावेळी वैशाली घुगे यांना ‘यशस्विनी कृषी सन्मान’, सुनंदा भोसेकर यांना ‘यशस्विनी साहित्य सन्मान’, प्राची जागुष्टे-महाजन यांना ‘यशस्विनी उद्योजकता सन्मान’, मालती सगणे यांना ‘यशस्विनी सामाजिक सन्मान’, प्रगती बाणखेले यांना ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान’ आणि सविता मराठे यांना ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ प्रदान करण्यात आला. तसेच, रेखाताई नार्वेकर पुरस्कृत ‘युवा यशस्विनी पुरस्कार’ ॲड. परिक्रमा खोत यांना प्रदान करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना सन्मानित महिलांनी यशवंतराव चव्हाण सेंटरबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पत्रकार प्रगती बाणखेले यांनी समाजातील वाढती अंधश्रद्धा, महिला सुरक्षा आणि प्राथमिक शाळा बंद होण्याचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. लेखिका सुनंदा भोसेकर यांनी इतिहास आहे तसा मांडला गेला पाहिजे, असे नमूद केले. ॲड. परिक्रमा खोत यांनी महिलांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचा प्रवास सुरू राहील, असे आश्वासन दिले. राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी सातत्याने काम करत राहण्याची गरज मालती सगणे यांनी व्यक्त केली. वैशाली घुगे यांनी सेंद्रिय शेतीचा प्रसार करण्याचा मानस व्यक्त केला. प्राची जागुष्टे-महाजन यांनी येत्या काळातही निरपेक्ष मनाने काम पुढे सुरू ठेवण्याचा मनोदय व्यक्त केला.

कार्यक्रमास चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, अजित निंबाळकर, बी. के. अग्रवाल, विवेक सावंत, अदिती नलावडे, प्रा. फरिदा लांबे, प्रा. प्रज्ञा दया पवार, हर्षवर्धन देशमुख यांच्यासह यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त, पदाधिकारी, सदस्य आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. दत्ता बाळसराफ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी त्यांनी चव्हाण सेंटरच्या वाटचालीतील महत्त्वाच्या घटनांचा धांडोळा घेतला.


28
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!