Yevatmal Policenama घाटंजी पंचायत समिती अंतर्गत ५० पेक्षा अधिक वनराई बंधारे पूर्ण:
‘मिशन जलामृत घाटंजी’ मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त लोकप्रतिसाद – गट विकास अधिकारी सिकन्दर ईनामदार
घाटंजी : पोलीसनामा (अयनुद्दीन सोलन्की)
घाटंजी पन्चायत समिती अन्तर्गत दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी पंचायत समिती, घाटंजीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन जलामृत घाटंजी – ग्रामसमृद्धीची चतुःसूत्री’ या जलसंधारण मोहिमेला घाटन्जी तालुक्यात अभूतपूर्व यश मिळत आहे. या अभियानांतर्गत तालुक्यातील विविध गावांमध्ये श्रमदानातून आतापर्यंत ५० पेक्षा अधिक ‘वनराई बंधारे’ यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहेत.

श्रमदानातून जलसंधारण:
खडकाळ आणि मुरुमाड भागात पावसाचे पाणी जमिनीवरून वेगाने वाहून जाते. यावर मात करण्यासाठी ओढ्यांवर आणि नाल्यांवर रिकाम्या सिमेंटच्या पिशव्यांमध्ये वाळू आणि माती भरून हे वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेत शासनासोबतच ग्रामपंचायत पदाधिकारी, शेतकरी, महिला बचत गट, युवक मंडळे आणि शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येत ‘श्रमदानातून जलसंधारण’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.

या उपक्रमामुळे ओढ्यांमधील पाणी अडवले गेल्याने परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या (बोअरवेल) पाणीपातळीत लक्षणीय वाढ होण्यास मदत होणार आहे. रब्बी हंगामासाठी देखील हे साठवलेले पाणी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल.
“हे अभियान केवळ शासनाची मोहीम नाही, तर ही गावाच्या शाश्वत विकासासाठी उभी राहिलेली लोकचळवळ आहे. घाटन्जी तालुक्यात ५० बंधाऱ्यांचा टप्पा पार करणे हे गावातील जनतेच्या दृढ संकल्पाचे आणि एकजुटीचे प्रतीक आहे.”

आगामी काळात घाटन्जी तालुक्यात घरकुल तिथे शोषखड्डा, विहीर पुनर्भरण आणि वृक्षलागवड यांसारखे उपक्रम अधिक वेगाने राबविले जाणार आहे, अशी माहिती घाटंजी पन्चायत समितीचे गट विकास अधिकारी सिकन्दर ईनामदार (BLOCK DEVELOPMENT OFFICER SIKANDAR INAMDAR) यांनी या वेळी दिली.














