ऑनलाईन ७/१२ उतारा सेवा बंद झाल्याने तर्क-वितर्क; तांत्रिक बिघाड की माहिती लपवण्याचा प्रयत्न?
पोलीसनामा ऑनलाईन | ( दीपक धुवे) पुणे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुटुंबीयांच्या नावावर तब्बल १,१४७ एकर इतकी अफाट जमीन असल्याचा दावा समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच राज्याच्या महसूल विभागाचे ‘सातबारा’ (7/12) संकेतस्थळ अचानक बंद पडल्याने आता नवा वाद आणि संशय निर्माण झाला आहे.
काय आहे नेमके प्रकरण? काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुटुंबीयांच्या नावे मोठ्या प्रमाणावर जमीन आहे. हा आकडा ११४७ एकरच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. ही माहिती सार्वजनिक होताच सोशल मीडियावर याची मोठी चर्चा सुरू झाली. अनेक जागरूक नागरिकांनी आणि विरोधकांनी या जमिनीचे फेरफार आणि सातबारा उतारे तपासण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर धाव घेतली.
संकेतस्थळ ‘डाऊन’ की ‘शटडाऊन’? विशेष म्हणजे, ही खळबळजनक माहिती समोर आल्यानंतर काही वेळातच शासनाचे अधिकृत सातबारा पोर्टल ठप्प झाले. अनेक तास प्रयत्न करूनही नागरिकांना जमिनीच्या नोंदी पाहता येत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. “एवढ्या मोठ्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच नेमके पोर्टल कसे काय बंद पडू शकते?” असा सवाल आता सामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
तांत्रिक बिघाड की जाणीवपूर्वक कारवाई? नेहमी सुरळीत चालणारे हे संकेतस्थळ एकाएकी बंद पडण्यामागे तांत्रिक कारण आहे की, काही विशिष्ट माहिती सर्वसामान्यांपासून लपवण्यासाठी ते जाणीवपूर्वक बंद करण्यात आले आहे, याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, या ‘योगायोगा’मुळे महसूल विभागाच्या कारभारावर संशयाचे ढग दाटले आहेत.
राजकीय वातावरण तापणार! एकीकडे जमिनीच्या या अवाढव्य आकड्यामुळे बावनकुळे अडचणीत येण्याची शक्यता असतानाच, पोर्टल बंद झाल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. या प्रकरणी आता पारदर्शक चौकशी व्हावी आणि तातडीने पोर्टल सुरू करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी जोर धरत आहे.
या सर्व प्रकरणावर आता शासन काय अधिकृत खुलासा करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.












