मोठी बातमी : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी घाटंजीत ‘मेडिकल’ बंद; औषध विक्रेत्यांचा देशव्यापी आंदोलनात सहभाग
घाटंजी : पोलीसनामा ऑनलाइन (अयनुद्दीन सोलन्की) – ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून सुरू असलेल्या अव्यावसायिक स्पर्धेच्या निषेधार्थ अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला घाटंजी तालुक्यातून मोठा पाठिंबा मिळाला असून, बुधवारी (२० मे) घाटंजी तालुका व शहरातील सर्व मेडिकल दुकाने पूर्णतः बंद राहतील, अशी माहिती घाटंजी केमिस्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे.
तहसीलदारांना दिले निवेदन
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे यांना असोसिएशनच्या वतीने अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. ऑनलाईन औषध विक्रीमुळे स्थानिक अधिकृत औषध विक्रेत्यांवर होत असलेला अन्याय आणि रुग्णांच्या आरोग्याशी होणारी खेळखंडोबा याकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
तहसीलदारांना निवेदन देताना घाटंजी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रवी बेलोरकर, सचिव मिलिंद बनसोड, कोषाध्यक्ष डॉ. नरेंद्र गुप्ते, यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी सदस्य दयाशंकर वैश्य आणि दीपकजी अग्रवाल यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख औषध व्यावसायिक व मेडिकल चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आवाहन
२० मे रोजी शहरातील सर्व लहान-मोठी मेडिकल दुकाने कडकडीत बंद राहणार असल्याने नागरिकांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी आपली आवश्यक औषधे आधीच खरेदी करून ठेवावीत, असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, ऐनवेळी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून काही अत्यावश्यक सेवांबाबत काय नियोजन असेल, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे. घाटंजी तालुक्यातील या १०० टक्के बंदच्या पुकारामुळे आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
















