नायरा कामगारांचा २८ तारखेला काम बंद संपाचा इशारा.


नायरा कामगारांचा २८ तारखेला काम बंद संपाचा इशारा.

प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा निर्णय; कंपनी व्यवस्थापनाला पूर्वसूचना !

पोलीसनामा (देवळी प्रतिनिधी)

गेल्या अनेक दिवसांपासून नायरा एनर्जी लिमिटेड निमगाव (सबाने) येथिल कामगार आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत. नायरा कंपनीमध्ये कार्यरत कामगारांच्या वेतन, कामाचे तास, ओव्हरटाईम, वैद्यकीय भत्त्यासह विविध प्रलंबित मागण्यांवर अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नसल्याने कामगारांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून काम बंद संप करण्याचा इशारा कंपनी व्यवस्थापनला दिला आहे.१६ सप्टेंबर रोजी कामगार युनियन च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, तहसीलदार वर्धा यांच्या कडे निवेदन सादर करीत आंदोलनाची परवानगी मागितली होती. ती परवानगी आता मान्य झाल्याने कंपनी समोर येत्या २८ तारखेला काम बंद संप करणार असल्याचे कामगारांनी सांगितले.

कंपनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आजूबाजूच्या गावातील लोक तिथे काम करण्यासाठी जात असतात. महागाईच्या काळात सुध्दा कामगार कायद्यानुसार हक्काचे वेतन भेटत नसल्याने कामगारांनी आता काम बंद संप चा निर्णय घेतला आहे‌. कंपनीमध्ये विविध एजन्सी च्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात सेवा पुरवली जाते. चेकमेट, एच.के.सी.,वेन्चर विहार, निनाद, राम नर्सरी, सेक्युरीक्स एजन्सीतील कामगार आपली सेवा देत असतात. मात्र यापैकी कुठल्याच कामगारांना न्याय भेटत नसल्याने कामगारांनी एकत्रित येऊन प्रलंबित मागण्यांकडे कंपनी व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततामय व कायदेशीर पद्धतीने काम बंद संप करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पूर्वसूचनेत नमूद करण्यात आले आहे. कामगारांच्या मागण्यांवर योग्य तो निर्णय घेऊन त्या पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

जोपर्यंत आमच्या सर्व कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत कंपनीकडून लेखी आश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत कामगारांचा संप सुरूच राहील,” असा इशारा कामगारांनी दिला आहे.

कामगारांच्या या भूमिकेमुळे २८ सप्टेंबरपासून नायरा कंपनीतील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून, कंपनी व्यवस्थापन आता या प्रलंबित मागण्यांवर कोणती भूमिका घेते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.


28
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!