​बापाचा आणि पोराचा कोठडीत छळ करून निर्घृण हत्या; ९ नराधम पोलिसांना ‘फाशी’, मदुराई न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!


कोरोना काळातील ‘त्या’ अमानुष कृत्याचा हिशोब चुकता; खाकी वर्दीला काळिमा फासणाऱ्या पोलिसांना थेट मृत्युदंड

पोलीसनामा ऑनलाईन ( विक्रम उईके )

मदुराई (तमिळनाडू)

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या आणि ‘खाकी’ वर्दीला काळिमा फासणाऱ्या तमिळनाडूतील सात्तानकुलम पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. मदुराई जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निकाल देत, व्यापारी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांच्या हत्येप्रकरणी दोषी आढळलेल्या ९ पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची (मृत्युदंड) शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पोलीस दलातील गुन्हेगारी वृत्तीला मोठा चपराक बसली असून पीडित कुटुंबाला ६ वर्षांनंतर न्याय मिळाला आहे.

काय होते हे थरकाप उडवणारे प्रकरण?

जून २०२० मध्ये, संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉकडाऊन असताना सात्तानकुलम येथे पी. जयराज (६२) आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स (३१) यांचे मोबाईल दुकान होते. केवळ दुकान उशिरापर्यंत उघडे ठेवल्याच्या क्षुल्लक कारणावरून पोलिसांनी या बाप-लेकाला ताब्यात घेतले होते. मात्र, पोलीस कोठडीत नेल्यानंतर पोलिसांनी क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या. त्यांना रात्रभर अमानुष मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये दोघांनाही गंभीर अंतर्गत जखमा झाल्या होत्या. उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला, ज्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती.

सहा वर्षांचा प्रदीर्घ लढा आणि सत्याचा विजय

या प्रकरणाचा तपास सीबीआयने (CBI) केला होता. ऑगस्ट २०२२ मध्ये सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. तपासात समोर आले की, पोलिसांनी केवळ सत्तेचा माज दाखवण्यासाठी या दोन निष्पाप व्यक्तींचा जीव घेतला. सुमारे सहा वर्षांच्या सुनावणीनंतर, मार्च २०२६ मध्ये न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे नऊही पोलिसांना खुनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले आणि आता त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

पोलीस कोठडीत ‘छळछावणी’ चालवणाऱ्यांना सज्जड दम

न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले की, कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा त्यांना कोणतीही दया दाखवली जाऊ शकत नाही. कोठडीतील हिंसाचार (Custodial Torture) हा मानवाधिकारांचे सर्वात मोठे उल्लंघन आहे. ९ पोलिसांना एकाच वेळी फाशीची शिक्षा सुनावल्याने अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलिसांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पीडित कुटुंबाचे अश्रू पुसले गेले

“आमचा संसार उद्ध्वस्त झाला, पण आज या निकालामुळे आम्हाला शांतता लाभली आहे,” अशा भावना जयराज यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत. या प्रकरणासाठी सोशल मीडियावर ‘जस्टिस फॉर जयराज अँड बेनिक्स’ ही मोहीम जागतिक स्तरावर गाजली होती.

ह्या आहेत रेवती संथोषकुमार हेड कॉन्स्टेबल साथानकुलम पोलीस स्टेशन, तामिळनाडू!

पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मदुराईच्या सत्र न्यायालयाने ज्या ९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली… त्या प्रकरणातील त्या मुख्य साक्षीदार आहेत… त्यांनी सर्व प्रकार पहिला होता.
रेवती यांची साक्ष या शिक्षेत अत्यंत महत्त्वाची ठरली आहे… आपल्या बड्या अधिकाऱ्यांसमोर साक्ष देणं धाडसाचं असतं…
सध्या संपूर्ण तामिळनाडूची जनता त्यांच्या या धाडसाचं कौतुक करत आहे….

रेवती यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.. हे लक्षात घेऊन मदुराई सत्र न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला विशेष पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले होते. तसेच त्यांना सशुल्क रजा Paid Leave देऊन सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.
मदुराई न्यायालयाने आपल्या निकालपत्रात रेवती यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक सुद्धा केले आहे…
जर त्यांनी भीतीपोटी मौन बाळगले असते, तर कदाचित या ९ आरोपींना शिक्षा होणे कठीण झाले असते. खऱ्या अर्थाने त्या या प्रकरणातील ‘रिअल हिरो’ ठरल्या आहेत!

‘पोलीसनामा’ विशेष टिपणी:

हा निकाल केवळ एका गुन्ह्याची शिक्षा नाही, तर वर्दीचा गैरवापर करणाऱ्या प्रत्येकासाठी धोक्याची घंटा आहे. पोलीस ठाणे हे गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवण्यासाठी असावे, सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर उठण्यासाठी नाही. मदुराई न्यायालयाने दिलेला हा फाशीचा निकाल भारतीय न्यायव्यवस्थेतील एक मैलाचा दगड ठरेल.


11
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!