यवतमाळ: धनज येथे चार दिवसीय ‘कन्या कौशल्य साधना शिबिर’ संपन्न; सुनील कुमार डोहरे यांचे प्रबोधन
यवतमाळ (विशेष प्रतिनिधी):
मुलींच्या दैवी शक्तीला जागृत करून त्यांच्यात सुसंस्कार, गृहस्थ व्यवस्थापन आणि आदर्श नारीचे गुण रुजवण्यासाठी धनज (माणिकवाडा) येथे आयोजित करण्यात आलेले चार दिवसीय ‘कन्या कौशल्य साधना शिबिर’ अत्यंत उत्साहात संपन्न झाले. अखिल विश्व गायत्री परिवार, शांतिकुंज (हरिद्वार) यांच्या तत्त्वाधनाखाली आणि श्री फकिरजी महाराज संस्थान, धनज व गायत्री परिवार, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरादरम्यान दिग्रस येथील आदरणीय सुनील कुमार डोहरे (गायत्री तीर्थ, शांतिकुंज – हरिद्वार) यांचे विशेष प्रवचन आणि मार्गदर्शन लाभले.
संस्कारांचे शिक्षण काळाची गरज: सुनील कुमार डोहरे
कार्यक्रमात बोलताना सुनील कुमार डोहरे यांनी मुलींवर बालपणापासूनच सुसंस्कार करण्यावर भर दिला. ते म्हणाले, “शाळेतील पुस्तकी शिक्षण आवश्यक आहेच, परंतु गृहस्थ जीवनाच्या संस्कारांचे शिक्षण त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे. शालेय विषयांचे ज्ञान आयुष्यात काही टक्के उपयोगी पडेल, परंतु कौटुंबिक आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण मुलींना जीवनातील प्रत्येक परीक्षेत १०१ टक्के यशस्वी करेल.” मुलींनी सासर आणि माहेर या दोन्ही कुटुंबांना आनंदी ठेवून सक्षम ‘गृहलक्ष्मी’ची भूमिका पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी आपल्या प्रवचनातून केले.
विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
अखंड दीपक व मातृशक्ती जन्म शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या शिबिरात २८ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत विविध धार्मिक आणि रचनात्मक कार्यक्रमांची रेलचेल होती. महिला साधकांसाठी विशेष समूह साधना, यज्ञ, गायत्री महायज्ञ आणि प्रबोधनपर संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संगीत चमुने सादर केलेल्या सुश्राव्य भजनांनी आणि क्रांतीगीतांनी संपूर्ण परिसर भक्तीमय आणि ऊर्जावान झाला होता.
१२ ते २० वयोगटातील मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या कन्या कौशल्य साधना शिबिरामध्ये १२ ते २० वयोगटातील असंख्य मुलींनी सहभाग घेतला होता. शिबिरादरम्यान मुलींना स्वयंपाक, स्वच्छता, पूजा-अर्चा, व्रत-नियम, आरोग्य सेवा यांसारख्या घरगुती व्यवस्थापनासोबतच कला, संगीत, शिवणकाम आणि विणकाम यांचेही धडे देण्यात आले. ‘२१ वे शतक – नारी शतक’ हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मुलींनी आजच्या युगात स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि देशासाठी आदर्श नागरिक बनावे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री फकिरजी महाराज संस्थान व गायत्री परिवार यवतमाळच्या सर्व कार्यकर्त्यांनी, स्थानिक ग्रामस्थांनी आणि महिला भाविकांनी मोठे परिश्रम घेतले.

















