NEET घोटाळ्यात सर्वात मोठा धमाका! शंभर कोटींच्या ‘आरसीसी’ कोचिंगचे संचालक शिवराज मोटेगावकर


NEET घोटाळ्यात सर्वात मोठा धमाका! शंभर कोटींच्या ‘आरसीसी’ कोचिंगचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना CBI कडून अटक; लातूर पॅटर्न हादरला

लातूर/पुणे : पोलीसनामा (दीपक धूवे)

देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी झालेल्या ‘नीट’ (NEET UG २०२६) परीक्षा घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. महाराष्ट्रात ‘लातूर पॅटर्न’चा मुख्य चेहरा आणि कोट्यवधींचे साम्राज्य असलेल्या प्रसिद्ध ‘आरसीसी’ (Renukai Chemistry Classes – RCC) कोचिंग इन्स्टिट्यूटचे संचालक प्रोफेसर शिवराज रघुनाथ मोटेगावकर उर्फ ‘एम सर’ यांना सीबीआयने अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून लातूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

लातूर आणि नांदेडमध्ये ‘एम सर’ या नावाने प्रसिद्ध असलेले मोटेगावकर नेमके कोण आहेत आणि शून्य ते शंभर कोटींचे साम्राज्य उभे करणारा हा शिक्षक सीबीआयच्या जाळ्यात कसा अडकला? वाचा ‘पोलीसनामा’चा सविस्तर विशेष अहवाल:

कोण आहेत शिवराज मोटेगावकर उर्फ ‘एम सर’?

शिवराज मोटेगावकर हे मूळचे लातूरचे रहिवासी असून त्यांनी एका छोट्या खोलीतून केमिस्ट्री (रसायनशास्त्र) शिकवायला सुरुवात केली होती. आपल्या आक्रमक शिकवण्याच्या शैलीमुळे आणि ‘आरसीसी’ (RCC) च्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना मेडिकलला प्रवेश मिळवून दिल्याचा दावा करत त्यांनी अल्पावधीतच मोठी प्रसिद्धी मिळवली. आज लातूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर याठिकाणी त्यांच्या भव्य कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, जिथे दरवर्षी हजारो विद्यार्थी कोट्यवधी रुपयांची फी भरून प्रवेश घेतात. ‘एम सर’ यांच्या एका शब्दावर लातूरच्या कोचिंग जगतात अब्जावधींची उलाढाल चालते, असे म्हटले जाते.

सीबीआयच्या जाळ्यात कसे अडकले ‘एम सर’?

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे आणि डिजिटल पुरावे लागले होते. यापूर्वी लातूरमधील जिल्हा परिषदेच्या काही शिक्षकांना आणि एजंटांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशी दरम्यान आणि जप्त करण्यात आलेल्या मोबाईल चॅट्स व कॉल डिटेल्समधून शिवराज मोटेगावकर यांचे नाव समोर आले.

प्रश्नपत्रिका आणि विद्यार्थ्यांची देवाणघेवाण : पेपर लीक करणाऱ्या आंतरराज्य टोळीशी (ज्यामध्ये बिहार आणि झारखंडचे धागेदोरे आहेत) मोटेगावकर थेट संपर्कात असल्याचा सीबीआयला संशय आहे.

आर्थिक उलाढाल : परीक्षेत गब्बर गुण मिळवून देण्यासाठी लाखो रुपयांची डिलिंग झाल्याचे पुरावे सीबीआयच्या हाती लागले आहेत. या घोटाळ्याचे पैशांचे कनेक्शन थेट ‘आरसीसी’च्या बँक खात्यांपर्यंत पोहोचल्याची खात्रीलायक माहिती आहे.

लातूर पॅटर्नला लागला काळा डाग

लातूर हे संपूर्ण देशात दर्जेदार शिक्षणासाठी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या निकालासाठी ‘लातूर पॅटर्न’ म्हणून ओळखले जाते. मात्र, त्याच लातूरमधील सर्वात मोठ्या कोचिंग क्लासच्या संचालकाला थेट सीबीआयने उचलल्यामुळे या पॅटर्नच्या विश्वासार्हतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वतःला ‘विद्यार्थ्यांचे कैवारी’ म्हणवणारे शिक्षकच या कोट्यवधींच्या पेपरफुटीच्या गोरखधंद्यात मुख्य सूत्रधार निघाल्याने पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.

पुढील तपास आणि चौकशीचा ससेमिरा

सीबीआयने मोटेगावकर यांना ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी नेले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांच्या अटकेमुळे या घोटाळ्यात सहभागी असलेल्या अनेक बड्या राजकीय नेत्यांची, अधिकाऱ्यांची आणि इतर नामांकित क्लास चालकांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीबीआय आता ‘एम सर’ यांच्या बँक खात्यांची, मालमत्तेची आणि गेल्या काही महिन्यांतील त्यांच्या संपर्काची कसून चौकशी करत आहे. या प्रकरणात आणखी काही मोठ्या अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


25
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!