घाडधडक कारवाई : घाटंजीत बँक ऑफ महाराष्ट्रचे ‘एटीएम’ फोडणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार रंगेहात गजाआड; जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घाटंजी पोलिसांना १५,००० रुपयांचे रोख बक्षीस!
यवतमाळ : पोलीसनामा (अयनुद्दीन सोलंकी) –
घाटंजी शहरामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम (ATM) फोडण्याचा धाडसी प्रयत्न उधळून लावत घाटंजी पोलिसांनी एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला रंगेहात अटक केली आहे. पोलिसांच्या या धडक आणि सतर्क कामगिरीमुळे बँकेतील मोठी रोकड चोरीला जाण्यापासून वाचली आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी घाटंजी पोलिसांचे जाहीर कौतुक करत तब्बल १५,ooo रुपयांचे रोख पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला आहे.
विजय तानबाजी मडावी (वय ३०, रा. राजुरवाडी, ता. घाटंजी) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.
खुनाच्या आरोपीचा शोध घेताना ‘एटीएम’ फोडीचा कॉल!
या थरारक कारवाईची सविस्तर माहिती अशी की, घाटंजी पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस फौजदार राहुल खंडागळे, पोलीस अंमलदार दत्ता कुसराम आणि सचिन नैताम हे यवतमाळ येथील अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेत होते. हे पोलीस पथक गस्तीवर असतानाच अचानक त्यांना ‘सीआरओ’ (CRO) यवतमाळ येथून नियंत्रण कक्षाचा तातडीचा फोन आला. “घाटंजी येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम कुणीतरी फोडत आहे, तिथे तात्काळ पोहोचा!” असा कडक संदेश मिळताच पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न लावता थेट बँकेकडे धाव घेतली.
गल्लीत, ट्रॅक्टरच्या पाठीमागे अंधारात दबा धरून बसला होता आरोपी!
घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना एटीएमचे नुकसान झालेले आणि ते फुटलेल्या अवस्थेत दिसले. पथकाने तात्काळ घाटंजीचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांना फोनवरून परिस्थितीची माहिती दिली. ठाणेदार ठाकरे यांनी हुशारी दाखवत पोलीस कर्मचाऱ्यांना एटीएमचा आजूबाजूचा परिसर आणि इतर एटीएम तात्काळ तपासण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी आजूबाजूला शोधमोहीम सुरू केली असता, एटीएमच्या बाजूलाच असलेल्या एका अरुंद गल्लीत, उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे अंधारात एक संशयित इसम लपून बसलेला आढळला. पोलिसांनी त्याला झडप घालून पकडले आणि उजेडात आणले. त्याची कसून चौकशी केली असता, तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विजय मडावी असल्याचे स्पष्ट झाले.
खिशात सापडले स्क्रू-ड्रायव्हर; सीसीटीव्ही फुटेजने गुन्हा केला सिद्ध!
पकडण्यात आलेल्या आरोपी विजय मडावी याच्या फुलपँटच्या खिशाची पोलिसांनी अंगझडती घेतली. त्याच्या खिशातून एटीएम तोडण्यासाठी वापरलेले दोन पाने (Spanners) आणि स्क्रू-ड्रायव्हरसारखा वापर करता येईल असा गाडीचा एक छोटा वायपर मिळून आला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन बँकेचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता, आरोपी विजय मडावी हा एटीएम मशीनची तोडफोड करताना स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले.
‘खाकी’च्या तत्परतेचे कौतुक; प्रत्येक अंमलदाराला ५-५ हजारांचे प्रोत्साहन!
यवतमाळ सीआरओ आणि घाटंजी पोलिसांच्या अद्भूत सतर्कतेमुळे शहरातील एक मोठी बँक चोरी टळली आहे. या कामगिरीबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांचे विशेष आभार मानले.
तसेच, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी या यशस्वी कामगिरीबद्दल घाटंजीचे ठाणेदार केशव ठाकरे व त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार केला. कारवाईत थेट सहभाग असलेल्या प्रत्येक पोलीस अंमलदाराला प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी ५,००० रुपयांचे वैयक्तिक बक्षीस दिले. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून एकूण १५,००० रुपयांचे रोख पारितोषिक घाटंजी पोलीस पथकाला बहाल करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे घाटंजी परिसरात खाकी वर्दीचे जोरदार कौतुक होत आहे.


















