‘तलवारधारी’ चोर आले आणि गेले तरी खाकी गप्प का? मांगडेवाडी सशस्त्र चोरांचे मृत्यूतांडव टळले; भारती विद्यापीठ पोलिसांना चोर सापडेनात!


‘तलवारधारी’ चोर आले आणि गेले तरी खाकी गप्प का? मांगडेवाडी सशस्त्र चोरांचे मृत्यूतांडव टळले; भारती विद्यापीठ पोलिसांना चोर सापडेनात!

पुणे : ( दीपक धूवे ) पोलीसनामा

पुणे-सातारा हायवेवरील मांगडेवाडी परिसरात असणाऱ्या एका सोसायटीत मध्यरात्री हातामध्ये तलवारी घेऊन आलेल्या ४ सशस्त्र चोरांनी धुमाकूळ घातला.

एकाच रात्री ३ ते ४ घरे फोडण्याचा प्रयत्न या टोळीने केला. ६ जून २०२६ च्या रात्री २:३९ वाजता घडलेल्या या थरारक घटनेमुळे संपूर्ण कात्रज- मांगडेवाडी परिसर दहशतीखाली वावरत आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) गुन्हा दाखल होऊन ६ दिवस उलटले, सीसीटीव्ही फुटेज समोर आले, तरीही पोलिसांना अजून चोरांचा साधी माग काढता आलेला नाही.

यावरून “पोलीस फक्त श्रीमंतांचे गुन्हेगार पकडण्यात व्यस्त आहेत का? आमच्या आया-बहिणींच्या सुरक्षेचे काय?” असा संतप्त आणि आर्त सवाल पीडित रहिवाशांनी ‘पोलीसनामा’शी बोलताना उपस्थित केला आहे.

६ जूनच्या रात्री २:३९ वाजता काय घडले? (घटनेचा थरार)

मांगडेवाडी येथील ‘निसर्ग लक्ष्मी रेसिडेन्सी’ (Nisarg Laxmi Residency, Sr No 2/4) या सोसायटीमध्ये ६ जून रोजी पहाटे २:३९ च्या सुमारास चार सराईत आणि सशस्त्र चोरटे घुसले. या चोरांनी थेट तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर ३०२ आणि ३०३ सह आजूबाजूची ३ ते ४ घरे टार्गेट केली. कपाटाचे कोयंडे आणि दारे तोडून चोरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

या दरम्यान ज्या घरात हा प्रसंग घडला, त्या घरातील कुटुंबप्रमुख कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घरात त्यांची पत्नी आणि मुलगी एकटीच होती. मध्यरात्री अचानक दरवाजा तोडण्याचा आवाज आला आणि दारात थेट हातात धारदार तलवारी घेतलेले ४ क्रूर चोर उभे दिसले. हा थरार पाहून त्या दोन्ही महिलांची भीतीने गाळण उडाली. त्या अत्यंत भावूक आणि जीवाच्या अकांताने ओरडल्या. सुदैवाने त्या रात्री मोठा अनर्थ टळला, परंतु या घटनेने महिलांच्या मनावर प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला आहे.

“४ ते ५ वेळा चोर येऊन गेले, भारती विद्यापीठ पोलीस झोपलेत का?”

संबंधित पीडित रहिवाशांनी अत्यंत संतप्त आणि भावूक होऊन ‘पोलीसनामा’कडे आपली व्यथा मांडली:

“माझ्या अनुपस्थितीत माझी बायको आणि मुलगी घरात एकट्याच होत्या. हातामध्ये नंग्या तलवारी घेऊन आलेल्या त्या चोरांना पाहून त्या आजही धडधडून घाबरत आहेत. आता आम्हाला त्या घरात राहण्याची देखील भीती वाटत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे चोर आतापर्यंत ४ ते ५ वेळा याच सोसायटीच्या परिसरात येऊन गेले आहेत. असे असतानाही भारती विद्यापीठ पोलीस कोणतीही ठोस कारवाई का करत नाहीत?”

पोलिसांची अजब पळवाट : ‘दुसऱ्या एरियात सीसीटीव्ही नाहीत!’

रहिवाशांनी जेव्हा पोलिसांकडे चोरांना पकडण्याबाबत तगादा लावला, तेव्हा पोलिसांनी नेहमीप्रमाणे तांत्रिक अडचणींचे रडगाणे गायले. “चोर आमच्या भागातील सीसीटीव्हीत दिसतात, पण ते ज्या बाजूने पळून गेले तिथल्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे चोरांचा माग काढता येत नाही,” अशी अजब आणि हतबलतेची पळवाट पोलिसांनी दाखवली आहे.

यावर नागरिकांचा संताप अनावर झाला असून, “पोलीस फक्त व्हीआयपी (VIP) किंवा श्रीमंत लोकांच्या घरच्या चोऱ्यांचे गुन्हे २४ तासांत उघडकीस आणतात का? सामान्य नागरिकांना वाली कोण?” असा थेट सवाल विचारला जात आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत कात्रज, धनकवडी, आंबेगाव आणि सिंहगड रोडच्या डोंगराळ भागाला लागून असलेल्या सोसायट्यांमध्ये रात्रीच्या वेळी सशस्त्र चोऱ्या करणाऱ्या टोळ्या (ज्याला ‘चड्डी-बनियान’ किंवा पारधी गँग सदृश टोळी म्हटले जाते) सक्रिय झाल्या आहेत. हे चोरटे दिवसा रेकी करतात आणि रात्रीच्या वेळी शस्त्र घेऊन सोसायट्यांमध्ये धुमाकूळ घालतात. मंगडेवाडीतील घटना ही याच टोळीचे कृत्य असण्याची दाट शक्यता आहे.

भारती विद्यापीठचे ठाणेदार साहेब, आतातरी जागे व्हा!

मांगडेवाडीतील निसर्ग लक्ष्मी रेसिडेन्सीमधील नागरिक आज रात्रीची झोप गमावून बसले आहेत. महिला आणि लहान मुले प्रचंड दहशतीखाली आहेत. आज जर चोरांनी तलवारीने त्या महिलांवर हल्ला केला असता, तर याला जबाबदार कोण राहिले असते?

भारती विद्यापीठ पोलिसांनी केवळ ‘कॅमेरे नाहीत’ म्हणून हात वर न करता, या भागात तात्काळ रात्रीची गस्त (Night Patrolling) वाढवणे गरजेचे आहे. पोलीस आयुक्तांच्या ‘सुरक्षित पुणे’ या संकल्पनेला भारती विद्यापीठ पोलिसांच्या सुस्त कारभारामुळे हरताळ फासला जात आहे. ‘पोलीसनामा’ मागणी करत आहे की, या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करून मांगडेवाडीतील नागरिकांना आणि माता-भगिनींना सुरक्षिततेचे वातावरण द्यावे, अन्यथा नागरिकांचा हा असंतोष पोलीस ठाण्यावर धडकल्याशिवाय राहणार नाही!

ब्युरो रिपोर्ट, पोलीसनामा न्यूज, पुणे.


22
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!