बडनेरा डेपो मॅनेजरचा हुकूमशाही कारभार!


बडनेरा डेपो मॅनेजरचा हुकूमशाही कारभार!

परिवहन मंत्र्यांच्या दौऱ्याच्या धाकाने ‘स्वच्छता’ अन् परवानाधारकांचा धंदा बळजबरीने पाडला बंद; प्रवाशांचे अतोनात हाल

बडनेरा : पोलीसनामा ऑनलाईन (आदेश पाठक) – बडनेरा बस डेपोचे डेपो मॅनेजर पवन देशमुख यांच्या मनमानी आणि हुकूमशाही कारभाराचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. आज, सोमवार दिनांक ८ जून २०२६ रोजी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे बडनेरा डेपोला भेट देणार होते. मात्र, मंत्र्यांसमोर आपली काळी कृत्ये आणि डेपोची दुरवस्था लपवण्यासाठी डेपो मॅनेजर देशमुख यांनी थेट हुकूमशाही फर्मान सोडत, बस डेपोमधील अधिकृत कॅन्टीन व फिरता विक्री परवानाधारकांचा व्यवसाय जबरदस्तीने बंद पाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

कोणताही लेखी आदेश नसताना अधिकृत परवानाधारकांचे हक्काचे पोट मारल्याने आणि त्यांच्याशी अरेरावी केल्याने बडनेरा बसस्थानकावर तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

कोणत्या नियमाने धंदा बंद केला? विचारले तर लायसन्स रद्द करण्याची ‘धमकी’!

परिवहन मंत्र्यांच्या दौऱ्याचे निमित्त साधून डेपो मॅनेजर पवन देशमुख यांनी अधिकृत फिरत्या विक्रेत्यांना आज तुमचा व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवा, असे ठासून बजावले. मात्र, हक्काचा खाद्य व्यवसाय का बंद ठेवावा? आणि कोणत्या नियमानुसार हा तोंडी आदेश दिला? असे परवानाधारकांनी विचारले असता, मॅनेजर देशमुख यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

इतकेच नव्हे तर विक्रेत्यांशी अत्यंत घाणेरडी अरेरावी करत त्यांचा व्यवसाय काही तासांसाठी बळजबरीने बंद पाडला. दुकानदार आणि विक्रेत्यांनी या मनमानी कारभाराविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता, “तुमचे लायसन्स (परवाना) रद्द करून टाकेन,” अशी थेट धमकीच डेपो मॅनेजरने दिली. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी गरिबांच्या पोटावर पाय देणाऱ्या या मॅनेजरच्या वृत्तीमुळे दुकानदारांमध्ये प्रचंड आक्रोश आहे.

मंत्र्यांच्या धाकाने ‘कचरा डेपो’ एका दिवसात चकाचक!

बडनेरा बस डेपोमध्ये नेहमी कचऱ्याचे साम्राज्य आणि दुर्गंधी पसरलेली असते, हा प्रवाशांचा रोजचा अनुभव आहे. मात्र, आज परिवहन मंत्री प्रतापदादा सरनाईक येणार या केवळ ‘धाकापोटी’ संपूर्ण आगार रातोरात स्वच्छ करण्यात आला. मंत्र्यांसमोर केवळ ‘चकाचक’पणाचा दिखावा करणारा हा ढोंगी कारभार पाहून प्रवाशांनीही संताप व्यक्त केला.

नव्या इमारतीचा पांढरा हत्ती; समस्यांचे ‘महामंडळ’:

१) उन्हाचा चटका अन् प्रवाशांचे हाल : डेपोमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून नवीन इमारत बांधण्यात आली आहे. मात्र, अत्यंत सुमार नियोजनामुळे चारही बाजूंनी बसस्थानकाच्या आतमध्ये सकाळी आणि दुपारी कडक ऊन राहते. त्यामुळे प्रवाशांना बसण्याची किंवा उभे राहण्याचीही सोय नाही.

२) २४ तास कुलूपबंद आणि घाणेरडे सुलभ शौचालय : डेपोमधील संडास-बाथरूम कधीही स्वच्छ नसतात. अनेकदा हे शौचालय २४ तास कुलूपबंद ठेवले जाते, ज्यामुळे महिला व लहान मुलांचे अतोनात हाल होतात.

३) ना पाणी, ना पोलीस चौकी : डेपोत सीसीटीव्ही कॅमेरे असूनही प्रवाशांच्या बॅगा आणि मोबाईल चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा मागणी करूनही येथे अजूनही पोलीस चौकी उभारण्यात आलेली नाही. तसेच प्रवाशांना पिण्यासाठी शुद्ध आणि योग्य पाण्याची कोणतीही सोय नाही.

४) साहेब ड्युटीवरून गायब : डेपो मॅनेजर पवन देशमुख हे कधीही वेळेवर ड्युटीवर उपस्थित नसतात, असा थेट आरोप प्रवाशांनी केला आहे.

अमरावतीचे अधिकारी आणि मंत्री महोदय ढिम्म; ‘पोलीसनामा’चा थेट सवाल:

या सर्व भीषण परिस्थितीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग नियंत्रण (MSRTC) अमरावतीचे वरिष्ठ अधिकारी आणि स्वतः परिवहन मंत्री प्रतापदादा सरनाईक यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मंत्र्यांच्या दौऱ्याच्या नावाखाली गरिबांचे दुकान बंद करायला लावणारे आणि कायदेशीर परवाना असूनही ‘लायसन्स रद्द करण्याची’ धमक देणारे डेपो मॅनेजर पवन देशमुख यांच्यावर वरिष्ठ अधिकारी तात्काळ निलंबनाची कारवाई करणार का? की या हुकूमशाही कारभाराला पाठीशी घालणार? अशी आक्रमक मागणी बडनेरा बसस्थानकावरील दुकानदार, परवानाधारक आणि त्रस्त प्रवाशांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, पोलीसनामा न्यूज, अमरावती/बडनेरा.


22
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!