बडनेरा डेपोत एसटी कर्मचाऱ्यांची मुजोरी! अधिकृत परवानाधारकासह प्रवाशांना शिवीगाळ❓
अमरावती/बडनेरा :- पोलीसनामा (आदेश पाठक)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) नागपूर गणेशपेठ आगाराच्या चालकासह वाहकाने बडनेरा डेपोत अधिकृत परवानाधारक फेरीवाल्याला अत्यंत हीन दर्जाची वागणूक देत हुज्जत घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
“गाडी तुमच्या बापाची नाही” असे म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी केवळ परवानाधारकालाच नव्हे, तर खाद्यपदार्थ खरेदी करणाऱ्या प्रवाशांनाही शिवीगाळ केल्याने बसस्थानकावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे, या बसने राजापेठ बसस्थानक ओलांडल्यानंतरही प्रवाशांना तिकीटच देण्यात आले नसल्याचे उघडकीस आले आहे.
नागपूर गणेशपेठ आगाराची एम एच १४ एन ई ००५६ (MH 14 NE 0056) या क्रमांकाची एसटी बस धुळ्याच्या दिशेने जात होती. ही बस बडनेरा डेपोत आली असता, विभागीय नियंत्रक अमरावती आगार यांच्याकडून रीतसर अधिकृत ‘फिरता विक्री परवाना’ मिळालेले फेरीवाले बसमध्ये खाद्यपदार्थ विकण्यासाठी चढले. यावेळी बसचे चालक राठोड आणि वाहक सागळे यांनी थेट मुजोरी सुरू केली.
“गाडीमध्ये खाद्यपदार्थांचा माल विकू नकोस, नाहीतर तुझा माल जप्त करेन. ही गाडी काही तुमच्या बापाची नाही,” अशा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन कर्मचाऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याला धमकावले. तसेच, या विक्रेत्याकडून खाद्यपदार्थ खरेदी करू पाहणाऱ्या प्रवाशांनाही वाहक-चालकाने शिवीगाळ केली.
महिन्याला २००० रुपये भरूनही अपमानास्पद वागणूक का?
एसटी महामंडळाच्या नियमानुसार, हे फिरते परवानाधारक दरमहा २००० रुपये डेपोला जमा करतात. महामंडळाने स्वतः त्यांना अधिकृतपणे व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. असे असतानाही नागपूर आगाराचे कर्मचारी स्थानिक परवानाधारकांना अशी गुंडप्रवृत्तीची वागणूक का देतात? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे
एसटी कर्मचाऱ्यांच्या या अरेरावीमुळे आणि तिकीट न फाडण्याच्या बेजबाबदार प्रकारामुळे प्रवासी वर्गात तीव्र संताप आहे. याप्रकरणी बडनेरा डेपोचे डेपो मॅनेजर पवन देशमुख आणि नागपूर गणेशपेठ आगाराचे डेपो मॅनेजर वर्धेकर साहेब यांनी संबंधित चालक राठोड आणि वाहक सागळे यांच्यावर तात्काळ निलंबनाची किंवा कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी प्रवासी, अमरावती जिल्ह्यातील सर्व परवानाधारक च्या वतीने करण्यात आली आहे.

















