बडनेरा : १५ वर्षांपासून ‘पांढरा हत्ती’ ठरले कोट्यवधींचे ट्रॉमा केअर सेंटर; प्रशासन झोपेत, अपघातग्रस्तांचे जीव टांगणीला!


बडनेरा : १५ वर्षांपासून ‘पांढरा हत्ती’ ठरले कोट्यवधींचे ट्रॉमा केअर सेंटर; प्रशासन झोपेत, अपघातग्रस्तांचे जीव टांगणीला!

बडनेरा : पोलीसनामा ऑनलाइन (आदेश पाठक) – विदर्भातील अत्यंत महत्त्वाचे वाहतूक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बडनेरा शहरात उभारण्यात आलेले कोट्यवधी रुपयांचे अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटर गेल्या १५ वर्षांपासून केवळ शोभेची वास्तू बनून उभे आहे. अकोला–मुंबई राष्ट्रीय महामार्ग, यवतमाळ–हैदराबाद मार्ग आणि समृद्धी महामार्गाच्या सानिध्यात असूनही, अपघातग्रस्तांना तातडीचे उपचार मिळत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. प्रशासनाच्या या निष्क्रियतेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

‘गोल्डन अवर’च्या घोषणा ठरल्या हवेत!

बडनेरा येथील मोदी हॉस्पिटल परिसरात १६ ऑक्टोबर २०११ रोजी तत्कालीन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते मोठ्या गाजावाजात या सेंटरचे भूमिपूजन करण्यात आले होते. “महामार्गावरील अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणार,” अशा वल्गना त्यावेळी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर इमारतीचे बांधकामही पूर्ण झाले, मात्र दीड दशक उलटूनही हे केंद्र सुरू करण्याची साधी इच्छाशक्ती प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दाखवलेली नाही.

महामार्गांवर मृत्यूचा सापळा, पण सेंटर बंदच!

बडनेरा परिसरातून जाणाऱ्या महामार्गांवर दररोज भीषण अपघात होत असतात. गंभीर जखमींना अमरावती किंवा नागपूरला नेईपर्यंत मौल्यवान वेळ निघून जातो. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. जर हे ट्रॉमा केअर सेंटर सुरू असते, तर शेकडो लोकांचे प्राण वाचले असते, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

काय आहे ट्रॉमा केअर सेंटरचे महत्त्व?

गोल्डन अवर : अपघातानंतरचा पहिला तास हा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.

अपेक्षित सुविधा : या केंद्रात अत्याधुनिक ICU, ऑपरेशन थिएटर, व्हेंटिलेटर, CT Scan, MRI आणि ब्लड बँक असणे आवश्यक होते.

तज्ज्ञ डॉक्टरांची फळी : ट्रॉमा सर्जन, न्यूरोसर्जन, ऑर्थोपेडिक आणि भूलतज्ज्ञांची २४ तास सेवा मिळणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात येथे केवळ ‘धुळ’ खात पडलेली इमारत शिल्लक आहे.

प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती!

कोट्यवधींचा निधी खर्चून इमारत उभी असताना आरोग्य विभागाने आवश्यक मनुष्यबळ का उपलब्ध करून दिले नाही? जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर विषयावर गप्प का आहेत? जनतेच्या कराच्या पैशातून उभारलेली वास्तू आज सरकारी उदासीनतेचे प्रतीक बनली आहे.

नागरिकांचा इशारा :

वाढती मृत्यूसंख्या पाहता बडनेऱ्यातील ट्रॉमा केअर सेंटर तातडीने सुरू करून तिथे डॉक्टर व कर्मचारी नियुक्त करावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन हे केंद्र कार्यान्वित करावे, अन्यथा भविष्यात उपचाराअभावी जाणाऱ्या प्रत्येक जीवाची नैतिक जबाबदारी ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचीच राहील, असा संतप्त इशारा बडनेरावासीयांनी दिला आहे.


जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

25
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

error: Content is protected !!