मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ( गुरुदत्त वाकदेकर ) शैक्षणिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणाऱ्या ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ (OJT) उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या करिअरला नवी भरारी मिळाली आहे. सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या उत्कृष्ट संधी प्राप्त झाल्या आहेत.
महाविद्यालयाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत तृतीय वर्षातील विद्यार्थिनींनी शाळा, कॉर्पोरेट कार्यालये, प्रसारमाध्यमे आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये १०० तासांचे प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील प्रशिक्षण पूर्ण केले. यातून विद्यार्थिनींना जबाबदारी, वेळेचे व्यवस्थापन आणि संवाद कौशल्य आत्मसात करण्यास मोठी मदत झाली.
नामांकित ज्वेलरी ब्रँड्समध्ये मिळाली नोकरी
विशेषतः मराठी विभागातील विद्यार्थिनींनी ‘रिटेल सेल्स असोसिएट ट्रेनिंग प्रोग्राम’ यशस्वीरीत्या पूर्ण केला. या प्रशिक्षणानंतर तनिष्क (Tanishq), कॅरेटलेन (CaratLane), सेन्को गोल्ड अँड डायमंड्स आणि त्रिभुवनदास भीमजी झवेरी (TBZ) यांसारख्या मोठ्या ज्वेलरी ब्रँड्समध्ये त्यांना नोकरीची संधी मिळाली आहे. हे विशेष प्रशिक्षण इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (IGI) च्या CSR उपक्रमांतर्गत ‘एएसआरए’ (ASRA) च्या माध्यमातून देण्यात आले होते.
आत्मविश्वास वाढवणारा उपक्रम – प्राचार्य डॉ. अर्चना पत्की
“ऑन द जॉब ट्रेनिंग हा उपक्रम विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे केवळ नोकरी मिळत नाही, तर विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत आहेत,” असे मत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी व्यक्त केले.
शिक्षणासोबतच ‘शिका आणि कमवा’ या संकल्पनेला मूर्त रूप देणाऱ्या या उपक्रमामुळे शैक्षणिक वर्तुळात महाविद्यालयाचे कौतुक होत आहे. प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थिनींच्या मेहनतीमुळे या उपक्रमाला मोठे यश मिळाले असून, यामुळे विद्यार्थिनींच्या भविष्याला नवी दिशा मिळाली आहे.











