देवळी (पोलीसनामा प्रतिनिधी):
नगर परिषद देवळीच्या सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ७९ कोटी ३० लाख ५३ हजार ४७७ रुपयांचा सर्वसमावेशक अर्थसंकल्प नुकताच जाहीर करण्यात आला. ‘व्हिजन देवळी – नव्या युगाचे नवे स्वप्न’ या संकल्पनेवर आधारित हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वांगीण विकासाची ‘ब्ल्यूप्रिंट’ असल्याचा विश्वास नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी व्यक्त केला.
नगराध्यक्ष किरण ठाकरे व उपनगराध्यक्ष राहुल चोपडा यांनी नगर परिषद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत या अर्थसंकल्पाची सविस्तर माहिती दिली. विशेष सभेत सर्व सदस्यांच्या एकमताने या बजेटला मंजुरी देण्यात आली आहे.
महिला व युवकांसाठी खास तरतूद
शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश करण्यात आला आहे:
स्मार्ट सखी योजना: शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवणे.
पिंक टॉयलेट्स: महिलांच्या सुविधेसाठी खास स्वच्छतागृहे.
जिजाऊ बचत गट बाजार: महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे.
युवकांसाठी: डिजिटल स्टडी हब, को-वर्किंग स्पेस, नगराध्यक्ष फेलोशिप प्रोग्राम आणि कौशल्य विकास योजना.
आधुनिक प्रशासन आणि तंत्रज्ञान
प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी ‘आपलं शहर’ मोबाईल ॲप लाँच केले जाणार आहे. तसेच पाणीपुरवठा नियंत्रणासाठी SCADA प्रणाली आणि स्मार्ट कचरा व्यवस्थापनावर भर दिला जाणार आहे.
सांस्कृतिक आणि पर्यावरणीय पाऊल
संत तुकाराम महाराज व संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मरणार्थ ‘तुका-संताजी स्मृती विश्व’ उभारले जाणार आहे. ‘ग्रीन देवळी’ अंतर्गत मियावाकी पद्धतीने शहरी वनीकरण, सौर ऊर्जा प्रकल्प आणि ‘माझे घर जलसाक्षर घर’ अभियान राबवले जाईल.
पाणीपट्टी ‘जैसे थे’ 🫵🏻
गेल्या काही दिवसांपासून पाणीकरात कपात होण्याची चर्चा शहरात सुरू होती. मात्र, प्रशासनाने पाणीकरात कोणतीही कपात न करता विद्यमान दर कायम ठेवल्याचे स्पष्ट केले आहे.
“हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा ताळेबंद नसून देवळीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आखलेली विकासाची दिशा आहे.”
— किरण ठाकरे, नगराध्यक्ष
“महाराष्ट्र सरकार व आमदार राजेश बकाने यांच्या सहकार्याने हा अर्थसंकल्प यशस्वीपणे साकार होऊ शकतो, असा आम्हाला विश्वास आहे.”
— राहुल चोपडा, उपनगराध्यक्ष
ठळक वैशिष्ट्ये:
नगर-आरोग्य फिरते रुग्णालय व वॉटर एटीएमची सोय.
शहर प्रवेशद्वार सुशोभीकरण व आकर्षक रोषणाई.
स्मार्ट फेरीवाला झोन, हॅपी स्ट्रीट आणि विसावा उद्यान.
ठक्कर बाबा योजनेतून आदिवासी भागाचा विकास.













