विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पुन्हा पाणी; २४ तास आधीच ‘TET’ चा पेपर फुटल्याने २८ जूनची परीक्षा तडकाफडकी रद्द, भिवंडीत पोलिसांचा मध्यरात्री मोठा दरोडा


विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पुन्हा पाणी; २४ तास आधीच ‘TET’ चा पेपर फुटल्याने २८ जूनची परीक्षा तडकाफडकी रद्द, भिवंडीत पोलिसांचा मध्यरात्री मोठा दरोड

मुंबई/पुणे : पोलीसनामा दीपक धूवे

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या राज्यातील लाखो तरुण-तरुणींसाठी अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. रविवारी (२८ जून २०२६) संपूर्ण महाराष्ट्रात होणारी ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (TET 2026) पेपरफुटीच्या मोठ्या प्रकरणामुळे तातडीने रद्द करण्यात आली आहे. परीक्षेला अवघा एक दिवस उरला असतानाच हे रॅकेट उघडकीस आल्याने परीक्षा परिषदेला हा मोठा निर्णय घ्यावा लागला. यामुळे सुमारे ४ लाखांहून अधिक प्रामाणिक उमेदवारांना मानसिक धक्क्याला सामोरे जावे लागत आहे.

भिवंडी पोलिसांची धडक कारवाई; गुप्त माहिती ठरली अचूक

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पोलीस प्रशासनाला २७ जूनच्या मध्यरात्री एक अत्यंत गोपनीय आणि खात्रीशीर माहिती मिळाली होती. काही संशयित टोळ्यांकडे टीईटी परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरे आधीच पोहोचल्याचे तपासात समोर आले. या माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता रात्रीच एका गुप्त ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी काही मुख्य संशयितांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून छापील प्रश्न आणि काही तांत्रिक पुरावे जप्त केले आहेत.

अशी झाली पेपरफुटीची खात्री…

छाप्यादरम्यान मिळालेले प्रश्न खरे आहेत की खोटे, हे तपासण्यासाठी भिवंडी पोलिसांनी तातडीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले. अधिकाऱ्यांनी पोलिसांनी हस्तगत केलेल्या प्रश्नांची पडताळणी मूळ प्रश्नपत्रिकेशी केली असता, दोन्हीकडील प्रश्न तंतोतंत जुळत असल्याचे स्पष्ट झाले. गोपनीयतेचा पूर्णपणे भंग झाल्याचे समोर येताच परीक्षा परिषदेने रविवारची परीक्षा तात्काळ स्थगित (रद्द) करण्याचा निर्णय जाहीर केला. या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा कसून तपास पोलीस करत आहेत.

सुरक्षेचे दावे फोल; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप

नुकत्याच झालेल्या ‘NEET’ परीक्षेतील गोंधळानंतर राज्य सरकारने आणि परीक्षा परिषदेने या टीईटी परीक्षेसाठी प्रचंड कडक सुरक्षा व्यवस्था आखली होती. राज्यातील १,०२८ केंद्रांवर परीक्षेचे नियोजन चोख असल्याचा दावा केला जात होता. मात्र, परीक्षा सुरू होण्यापूर्वीच मुख्य प्रश्नपत्रिका परीक्षा माफियांच्या हाती लागल्याने शासकीय यंत्रणेच्या सुरक्षेच्या दाव्यांचे धिंडवडे निघाले आहेत.

नवीन तारीख लवकरच; उमेदवारांना संयम राखण्याचे आवाहन

परीक्षा परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे की, परीक्षेची गोपनीयता आणि पारदर्शकता अबाधित राखण्यासाठी ही परीक्षा तूर्तास स्थगित करणे अनिवार्य होते. कोणत्याही पात्र विद्यार्थ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही.

पोलीसनामा आवाहन : परीक्षार्थींनी सोशल मीडियावरील कोणत्याही चुकीच्या अफवांना बळी पडू नये. ‘TET 2026’ परीक्षेची पुढील सुधारित तारीख आणि नवीन वेळापत्रक लवकरच शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाईल.


25
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!