प्रायव्हेट नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO आणणार ‘युनिव्हर्सल पेन्शन योजना’; खाजगी कर्मचारी अन् गिग वर्क्सनाही मिळणार निवृत्तीवेतनाचा आधार
पुणे | पोलीसनामा ऑनलाइन – निवृत्तीनंतरचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहावे यासाठी पेन्शन हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. आतापर्यंत प्रामुख्याने सरकारी कर्मचाऱ्यांनाच पेन्शनचा मोठा लाभ मिळायचा, तर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही सोय मर्यादित होती. मात्र, आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) देशातील खाजगी कर्मचाऱ्यांसह सर्वच घटकांसाठी एक मोठी आणि सर्वसमावेशक ‘युनिव्हर्सल पेन्शन योजना’ सुरू करण्याच्या तयारीत आहे.
कोणाकोणाला मिळणार या योजनेचा फायदा?
EPFO च्या प्रस्तावित योजनेनुसार केवळ नेहमीच्या संघटित क्षेत्रातील नोकरदारच नव्हे, तर खालील घटकांनाही सामाजिक सुरक्षेचे कवच दिले जाणार आहे:
प्रायव्हेट कंपन्यांमधील कर्मचारी
छोटे व्यावसायिक व व्यावसायिक उद्योजक
फ्रीलान्सर्स आणि ऑनलाईन काम करणारे गिग/प्लॅटफॉर्म वर्कर्स
‘EPFO 3.0’ अंतर्गत देशाच्या एकूणच पेन्शन व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणण्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
दीर्घकालीन बचत व व्याज: सदस्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा पर्याय असेल, ज्यावर आकर्षक वार्षिक व्याज दिले जाईल.
टार्गेट रिटायरमेंट सम (TRS): वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर हा निधी ‘टार्गेट रिटायरमेंट सम’मध्ये परावर्तीत करण्याची सोय उपलब्ध होऊ शकते.
NPS पेक्षा वेगळी रचना: या योजनेत कर्मचाऱ्यांबरोबरच सीएसआर (CSR) फंड, बिगर शासकीय संस्था (NGO) आणि विविध कामगार वर्गाला जोडण्याची संकल्पना आहे.
पैसे काढण्यासाठी मिळतील २ मोठे पर्याय:
निवृत्तीनंतर जमा झालेला निधी कसा वापरायचा किंवा पेन्शन स्वरूपात कसा घ्यायचा, यासाठी दोन पर्याय मिळण्याची शक्यता आहे:
ॲन्युइटी प्लॅन (Annuity Plan): याच्या माध्यमातून कर्मचाऱ्याला दरमहा ठराविक पेन्शनची रक्कम मिळत राहील.
सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन (SWP): याद्वारे आवश्यकतेनुसार जमा फंडातून टप्प्याटप्प्याने पैसे काढता येतील.
तसेच, डिजिटल डॅशबोर्डद्वारे कर्मचाऱ्यांना आपल्या खात्यातील बचत आणि संभाव्य पेन्शनचा अंदाज एका क्लिकवर पाहता येणार आहे.
#PoliceNama #EPFO #PensionScheme














