घाटंजी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रशांत उगले यांची निवड; जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान


घाटंजी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रशांत उगले यांची निवड; जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

घाटंजी : पोलीसनामा ऑनलाइन (अयनुद्दीन सोलंकी) – घाटंजी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नगर परिषदेचे माजी शिक्षण सभापती आणि खंदे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत उगले यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांच्या हस्ते प्रशांत उगले यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील ही पहिली शहर अध्यक्ष नियुक्ती ठरली आहे.

या महत्त्वपूर्ण नियुक्तीवेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आरिज बेग (आर्णी), संजय ठाकरे, घाटंजी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पंचायत समितीचे माजी सभापती रुपेश कल्यमवार, माजी जिल्हा परिषद सदस्य वासुदेव महल्ले, माजी नगराध्यक्ष सुभाष गोडे, तालुका उपाध्यक्ष अरविंद चौधरी, ओबीसी आघाडीचे अनंत चौधरी आणि गजानन ठाकरे आदी प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

विविध सामाजिक व राजकीय पदांचा प्रदीर्घ अनुभव

नवनियुक्त अध्यक्ष प्रशांत उगले यांनी यापूर्वी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषविली आहेत. ते घाटंजी नगर परिषदेचे माजी शिक्षण व बांधकाम सभापती, तसेच संस्कृती विकास संस्थेचे संस्थापक सचिव आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे पर्यावरण, निसर्ग आणि पाणी संवर्धनाचे मोठे कार्य सुरू आहे.

 

याशिवाय ते अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका सचिव, ‘वाघाडी नदी वाचवा’ अभियानाचे संयोजक, शिक्षक महासंघाचे तालुकाध्यक्ष आणि कुणबी समाज परिचय मेळाव्याचे कार्याध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) आणि भाजप (BJP) मध्येही विविध पदांवर उल्लेखनीय कार्य केले आहे.

१० वर्षांपासून वाघाडी नदी पुनरुज्जीवन अभियान!

प्रशांत उगले यांचे सामाजिक कार्य अत्यंत दांडगे असून, ते गेल्या १० वर्षांपासून वाघाडी नदी स्वच्छता व खोलीकरण करून नदी पुनरुज्जीवन अभियान राबवित आहेत. पाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत त्यांनी स्वतः श्रमदान करत नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. सध्या ते ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ आणि पर्यावरण रक्षणासाठी देशी वृक्ष बियाणे लागवड व वृक्षारोपणावर विशेष भर देत आहेत.

कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी सलग १०० दिवस गरजू नागरिकांना अन्न शिजवून त्याचे वाटप केले होते. तसेच लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत अनेक कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले होते.

नेत्यांकडून कौतुक अन् अभिनंदनाचा वर्षाव

प्रशांत उगले यांनी आपल्या या निवडीचे श्रेय खासदार प्रतिभाताई धानोरकर, ॲड. शिवाजीराव मोघे आणि जिल्हा सरचिटणीस जितेंद्र मोघे यांना दिले आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल नगराध्यक्ष परेश कारिया, नगरसेविका सौ. संगीता भुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिक मेश्राम, माजी नगराध्यक्ष किशोर दावडा, पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. विजय कडू, ॲड. विजय भुरे, आलोक बाजपेई, विजय देवतळे, संजय अग्रवाल, सुरेश आडे, सुनील हुड, सारंग कहाले, करण तोडसाम, रमीज शेख आदींसह घाटंजी तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


25
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!