​हादरवणारी घटना : घाटंजीतील डॉक्टर दाम्पत्याच्या मुलीची फसवणूक; पतीसह सासरच्या ८ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल


हादरवणारी घटना : घाटंजीतील डॉक्टर दाम्पत्याच्या मुलीची फसवणूक; पतीसह सासरच्या ८ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

घाटंजी : पोलीसनामा ऑनलाइन – आयनुद्दीन सोलंकी

घाटंजी येथील एका प्रतिष्ठित डॉक्टर दाम्पत्याच्या उच्चशिक्षित मुलीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, पतीसह सासरच्या आणि नातेवाईक अशा एकूण ८ जणांविरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे घाटंजी शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी नवरा आशिष विजय तुरखडे (वय ३५), विजय बाजीराव तुरखडे (वय ६५), सासू ज्योती विजय तुरखडे (वय ६०), नणंद आरती अनिल जगताप (वय ३३), नणंदावा अनिल सुरेश जगताप (वय ४०), मामा मधुसूदन श्रीराम उमेकर (वय ७०), सुनील उमेकर (वय ७०, सर्व रा. अमरावती) आणि मंगला खोडे (वय ५५, रा. मुंबई) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई

फिर्यादी डॉ. सुनील रामदासराव बोन्डे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, १७५ (३) अन्वये घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात किरकोळ फौजदारी अर्ज (१३/२०२६) दाखल केला होता. या प्रकरणी ॲड. गणेश धात्रक यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. हा युक्तिवाद आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी प्रवीण पाटील यांनी ८ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार २३ एप्रिल २०२६ रोजी घाटंजी पोलिसांनी ही कारवाई केली.

गुन्ह्याचे स्वरूप

उच्चशिक्षित असलेल्या पीडित विवाहितेची सासरच्या मंडळींनी आणि नातेवाईकांनी संगनमत करून फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलिसांनी या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (१), ३१८ (२) आणि ३१८ (४) अंतर्गत फसवणुकीचे गुन्हे नोंदवले आहेत.

पोलीस तपास वेगात

घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार राहुल खंडागळे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलीच्या फसवणुकीचे हे प्रकरण आता न्यायालयात गेल्याने आणि एकाच वेळी ८ जणांवर गुन्हे दाखल झाल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://www.facebook.com/share/r/1CoXg2b1vg/


18
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!