भ्रष्टाचाराचा ‘विस्तार’ : लाचखोर विस्तार अधिकारी एस. जे. इसलकर प्रकरणाची १६ जूनला हायप्रोफाईल सुनावणी; साक्षीदाराला समन्स, संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष!
घाटंजी : पोलीसनामा ऑनलाईन (अयनुद्दीन सोलंकी) – घाटंजी पंचायत समितीचे वादग्रस्त पंचायत विस्तार अधिकारी (पंचायत) आणि नेर पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गट विकास अधिकारी (BDO) सखाराम जयवंतराव इसलकर यांच्या विरुद्ध यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दाखल केलेल्या लाचखोरीच्या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवार, दिनांक १६ जून २०२६ रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे.
या प्रकरणाचा अंतिम निकाल लागण्यास आता काहीच अवधी बाकी असताना, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी यापूर्वीच २८ जानेवारी २०२६ रोजी साक्षीदारास समन्स बजावला होता. दरम्यान, याआधी १२ मे २०२६ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान साक्षीदार अनुपस्थित होते, तर न्यायालयही सुट्टीवर (Vacation) होते. त्यामुळे आता १६ जून रोजी होणाऱ्या या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अंगणवाडी चौकशीच्या नावाखाली ५ हजारांची लाच!
या लाचखोरीच्या प्रकरणाची धक्कादायक पार्श्वभूमी अशी की, सखाराम जयवंतराव इसलकर हे नेर पंचायत समितीत प्रभारी गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना, चिकणीडोमगा येथील अंगणवाडीच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी त्यांनी सचिव/ग्रामसेवक गणेश सुखदे यांच्याकडे ५,००0 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी २,००० रुपये इसलकर यांनी आधीच वसूल केले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रचलेल्या सापळ्यात उर्वरित ३,००० रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले होते.
याप्रकरणी नेर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७, १३(१)(डी) सह १३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. एसीबीने या प्रकरणाचा सखोल तपास करून यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात संशयित आरोपी सखाराम इसलकर विरुद्ध दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल केले असून, सध्या हा खटला अंतिम टप्प्यात आहे.
‘टेबलवर बसूनच तपासणी अहवाल’; भ्रष्टाचाराचे नवे गंभीर आरोप!
एकीकडे लाचखोरीचा खटला न्यायालयात सुरू असतानाच, दुसरीकडे विस्तार अधिकारी इसलकर यांच्या काळ्या कारभाराची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. घाटंजी पंचायत समितीमधील काही ग्रामपंचायतींच्या तपासणीच्या नावाखाली त्यांनी ग्रामपंचायत सचिवांकडून मोठ्या प्रमाणावर रकमा उकळल्याचा गंभीर आरोप माजी सरपंच नथ्थू वेट्टी यांनी केला आहे. कोणत्याही ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेट न देता, पंचायत समितीच्या कार्यालयात खुर्चीवर बसूनच भेटी दिल्याचा खोटा ‘तपासणी अहवाल’ इसलकर यांनी तयार केल्याचा खळबळजनक आरोप कवाडे यांनी केला आहे.
शिरोली, मुरली अन् कुऱ्हाड ग्रामपंचायतीचा ‘लोचा’; अहवाल गायब!
कुर्ली येथील तक्रारदार सोलंकी यांनी केलेल्या लेखी तक्रारीनुसार, घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी वंदना नानोटे यांनी स्पष्ट निर्देश देऊनही, शिरोली, मुरली आणि मौजा कुऱ्हाड या तीनही ग्रामपंचायतींच्या चौकशी अहवालाची प्रत विस्तार अधिकारी इसलकर यांनी जाणीवपूर्वक दडपून ठेवली आहे, ती अद्याप तक्रारदाराला दिलेली नाही.
तसेच, कुऱ्हाड व मुरली येथील ग्रामपंचायत अधिकारी तथा सचिव मंगेश व्ही. गाऊत्रे यांच्याकडून लेखापरीक्षण अहवालानुसार (Audit Report) आक्षेपाधीन व वसूलपात्र रक्कम तात्काळ वसूल करून, त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१६(२), ३१६(५) व ३१८(४) अन्वये सरकारी निधीच्या अपहाराचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदार सोलंकी यांनी बीडीओ वंदना नानोटे यांच्याकडे केली आहे.
“पंचायत विभागाचे कोणतेही चौकशीचे किंवा इतर पत्रे हे विस्तार अधिकारीच स्वतःच्या सोयीनुसार तयार करतात आणि बीडीओ मॅडमसमोर फक्त सहीसाठी ठेवतात. त्यामुळे या तिन्ही ग्रामपंचायतींची चौकशी जिल्हा परिषदेच्या सक्षम अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात यावी.” — असा थेट आणि खळबळजनक आरोप तक्रारदार सोलंकी यांनी केला आहे.















