मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (गुरुदत्त वाकदेकर)
माटुंगा येथील सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला ‘भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह’ (रोजगार मेळावा) अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. या मोहिमेत ७७४ विद्यार्थिनींनी नोंदणी केली, ज्यातून ४०१ विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष मुलाखती देऊन करिअरच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांच्या सहकार्याने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ या संकल्पनेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला.
२० नामांकित कंपन्यांचा सहभाग
या रोजगार मेळाव्यामध्ये २० प्रतिष्ठित कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. कला, वाणिज्य आणि इतर शाखांमधील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थिनींनी विविध पदांसाठी मुलाखती दिल्या. मुलाखतीदरम्यान विद्यार्थिनींचा आत्मविश्वास आणि संवादकौशल्य पाहून अनेक कंपन्यांनी त्यांचे कौतुक केले.
प्लेसमेंट सेलचे विशेष मार्गदर्शन
विद्यार्थिनींना मुलाखतीसाठी तयार करण्याकरिता महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलने विशेष परिश्रम घेतले. रेझ्युमे (Resume) लेखन, व्यक्तिमत्त्व विकास आणि मुलाखत तंत्राचे आधीच प्रशिक्षण देण्यात आले होते, ज्यामुळे विद्यार्थिनी अधिक आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोऱ्या गेल्या.
रोजगारक्षम बनवणे आमची जबाबदारी – प्राचार्य डॉ. अर्चना पत्की
या यशाबद्दल बोलताना प्राचार्य डॉ. अर्चना पत्की म्हणाल्या की, “केवळ शैक्षणिक ज्ञान देणे पुरेसे नसून, विद्यार्थिनींना रोजगारक्षम बनवणे ही आमची जबाबदारी आहे. स्पर्धात्मक युगात कौशल्य आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव महत्त्वाचा असून, या प्लेसमेंट ड्राइव्हच्या माध्यमातून आम्ही त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.”
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहायक आयुक्त शैलेश भगत, जिल्हा कौशल्य अधिकारी विद्या शिंगे, प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ. शुभांगी कुलकर्णी, डॉ. सरिता कासरळकर आणि प्रा. दत्तात्रय गावडे यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी विशेष सहकार्य केले.













