स्पा सेंटर चालकाकडे ५० हजारांची खंडणी मागितली; १० हजार रुपये स्वीकारताना ‘पत्रकाराला’ अटक
पोलीसनामा विशेष बातमी
स्पा सेंटर सुरळीत सुरू ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एका पत्रकाराला खंडणीविरोधी पथकाने रंगेहात अटक केली आहे. जगताप डेअरी परिसरात १० हजार रुपयांची खंडणीची रक्कम स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या स्पा सेंटरवर येऊन संबंधित व्यक्तीने व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर ५० हजार रुपये खंडणी द्यावी लागेल, अशी मागणी केली होती. तसेच पैसे न दिल्यास वर्तमानपत्रात बदनामीकारक बातम्या छापून व्यवसाय बंद पाडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती.
याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी जगताप डेअरी परिसरात आरोपीला १० हजार रुपयांची रोकड स्वीकारताना रंगेहात पकडले.
पोलिसांनी आरोपीकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, प्रेसचे ओळखपत्र आणि एक कार असा एकूण २ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे पत्रकारितेच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सदर धडक कारवाई खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड तसेच पोलीस अंमलदार अभिमन्यू बनसोडे, सुनील कानगुडे, प्रदीप पोटे, किरण जाधव, प्रदीप गोडांबे, रमेश मावसकर, किशोर कांबळे आणि दादाभाऊ साबळे यांच्या पथकाने पार पाडली. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
केवळ UDAM (उद्योग आधार / युद्यम) वर नोंदणी करून, फेसबुक आणि युट्यूबवर स्वतःचे न्यूज चॅनेल किंवा इंस्टाग्राम पेज तयार करायचे आणि बनावट आयडी कार्ड बनवून स्वतःला ‘पत्रकार’ म्हणवून घ्यायचे… अशा बेजबाबदार आणि खंडणीखोर प्रवृत्तींवर पोलिसांनी कडक कारवाई केलीच पाहिजे, असा सूर आता नागरिक आणि वृत्तपत्र वर्तुळातून व्यक्त होत आहे. मुळात अशा प्रकारे काम करणाऱ्यांना स्वतःला पत्रकार म्हणवून घेण्याचा कोणताही घटनात्मक वा संविधानिक अधिकार नाही, हीच बाब अधोरेखित करणारी कारवाई पिंपरी-चिंचवड खंडणीविरोधी पथकाने केली आहे.
















