लखनौ विद्यापीठात खळबळ: “माझं तुझ्यावर प्रेम आहे, दोन्ही पेपर तयार ठेवलेत, घरी ये!”; नराधम प्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे घाणेरडी मागणी, पोलिसांकडून मुसक्या आवळल्या
लखनौ/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात एकीकडे ‘नीट’ (NEET) परीक्षेतील घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच, आता उत्तर प्रदेशातील लखनौ विद्यापीठातून गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “डार्लिंग, तुझ्यासाठी मुख्य आणि ऐच्छिक दोन्ही पेपर्स काढून ठेवले आहेत, परीक्षेपूर्वी माझ्या घरी ये,” अशा शब्दांत एका पिसाट प्राध्यापकाने बी.एस्सी.च्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनीवर लैंगिक संबंधांसाठी दबाव टाकल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी लखनौ पोलिसांनी प्राणीशास्त्र (Zoology) विभागाचा सहायक प्राध्यापक डॉ. परमजीत सिंह (वय ४०) याला बेड्या ठोकल्या आहेत.
विद्यार्थिनीने प्राध्यापकासोबतचे धक्कादायक संभाषण रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केले होते, ज्याची गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे नेमका प्रकार?
आरोपी प्राध्यापक डॉ. परमजीत सिंह हा गेल्या चार वर्षांपासून लखनौ विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात कार्यरत आहे. त्याने १४ आणि १५ मे २०२६ च्या रात्री बी.एस्सी. अंतिम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला फोन केला. तिची आई आजारी असल्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत त्याने तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. त्याने विद्यार्थिनीला “बाळा, आई” अशी हाक मारत आर्थिक आणि वैद्यकीय मदतीचे आमिष दाखवले. मात्र, त्यानंतर त्याने आपला खरा रंग दाखवत थेट ‘एमएससी आणि पीएचडी अगदी स्टॅनफोर्ड विद्यापीठात’ करून देण्याचे स्वप्न दाखवून तिला घरी भेटायला बोलावले.
मुख्य आणि ऐच्छिक दोन्ही पेपर फोडल्याचा दावा!
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये हा प्राध्यापक अत्यंत निर्लज्जपणे सांगत आहे की, “मी तुझ्यासाठी मुख्य आणि ऐच्छिक दोन्ही विषयांचे (इम्युनोजेनेटिक्स आणि जीनोमिक्स) पेपर्स आधीच प्रिंट करून सुरक्षित ठेवले आहेत. मी हे फक्त तुझ्यासाठीच केले आहे.” विद्यार्थिनीने आपला अभ्यास पूर्ण झाल्याचे सांगून नकार देण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याने “तुला यावंच लागेल, मी तुझी वाट पाहीन. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझ्याशी भावनिकरित्या जोडलो गेलो आहे,” असे म्हणत दबाव कायम ठेवला.
संतापलेल्या विद्यार्थिनीने उघड केला उबगवाणा चेहरा!
प्राध्यापकाचा फोन कट झाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने ऑडिओच्या शेवटी आपली व्यथा मांडली आहे. ती म्हणते, “हा माणूस मला त्याच्या घरी आणि ऑफिसमध्ये बोलावतोय. पण मला तो पेपर नकोय आणि मी तिथे जाणार नाही. त्याला पुन्हा माझा विनयभंग करायचा आहे.” या धाडसी विद्यार्थिनीने हे संभाषण रेकॉर्ड करून थेट व्हायरल केले, ज्यामुळे या नराधम प्राध्यापकाचा खरा चेहरा जगासमोर आला.
वाचा प्राध्यापक आणि विद्यार्थिनीमधील ‘तो’ खळबळजनक संवाद:
प्राध्यापक : मी तुझ्यासाठी मुख्य आणि ऐच्छिक दोन्ही विषयांचे पेपर्स काढून ठेवले आहेत.
विद्यार्थिनी : नाही सर, मी आधीच अभ्यास केला आहे. माझा अभ्यास पूर्ण झाला आहे.
प्राध्यापक : अरे मित्रा, मी तुझ्यासाठी संपूर्ण पेपर जपून ठेवला आहे. तू फक्त इकडे ये. मग, तू एकदा मला भेटायला येणार नाहीस का?
विद्यार्थिनी : सर, परीक्षा संपल्यावर मी येईन.
प्राध्यापक : मला भेटायला ये, मी तुझ्यासाठी दोन्ही पेपर्स प्रिंट करून ठेवले आहेत. नाही, मी प्रयत्न करणार नाही, तुला यावंच लागेल. ठीक आहे, चार दिवसांच्या आत ये.
दुसऱ्या ऑडिओमधील संवाद :
प्राध्यापक : तू किती वेळ थांबणार आहेस? मी तुझी वाट पाहीन. तुला माहीत आहे की मी तुझ्यावर भाळलो आहे. मी तुझ्यासाठी एमएससी आणि पीएचडीचे अभ्यासक्रम तयार केले आहेत… अगदी स्टॅनफोर्डमध्ये सुद्धा. आणि… माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे… तुला माहित आहे मला काय वाटतं. कृपया सांगा तू कधी येणार. १० किंवा १५ दिवसांच्या आत. मी गृहीत धरतो की तू १० दिवसांच्या आत येशील.
विद्यापीठाच्या आवारातून प्राध्यापकाला अटक
हा ऑडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर लखनौ विद्यापीठ प्रशासनात एकच खळबळ उडाली. प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका अमिता कानोजिया आणि विद्यापीठाचे प्रवक्ते प्राध्यापक मुकुल श्रीवास्तव यांनी ऑडिओमधील आवाज डॉ. परमजीत सिंह याचाच असल्याचे स्पष्ट केले. विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ हजरतगंज पोलीस ठाण्यात ऑडिओ क्लिप सादर करून अधिकृत एफआयआर (F.I.R.) दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी रात्री उशिरा विद्यापीठाच्या आवारातच छापा टाकून आरोपी प्राध्यापक डॉ. परमजीत सिंह याच्या मुसक्या आवळल्या.
आरोपी प्राध्यापक मूळचा बिजनौरचा रहिवासी असून तो लखनौमध्ये पत्नी आणि दोन मुलींसह राहत होता. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रातील सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.













