पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल (IPS) यांच्या धडक कारवाईने दारू तस्करांचे धाबे दणाणले!


पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल (IPS) यांच्या धडक कारवाईने दारू तस्करांचे धाबे दणाणले! उंदरणी शेतशिवारात ७६ हजारांच्या दारूसह पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

घाटंजी (यवतमाळ) | पोलीसनामा (प्रतिनिधी – अयनुद्दीन सोलंकी) – अवैध धंद्यांवर व दारू तस्करीवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पांढरकवडा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल (IPS) यांनी दिल्यानंतर, पोलिसांनी उंदरणी शेतशिवारात धडक कारवाई करत मोठी बेकायदेशीर दारूची वाहतूक उघडकीस आणली आहे. अकोला बाजार वरून घोटीकडे कारमधून होणारी देशी दारूची वाहतूक रोखून पोलिसांनी ७६ हजार रुपयांच्या देशी दारूसह तब्बल २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुप्त माहितीवरून उंदरणी फाट्यावर नाकेबंदी
मिळालेल्या माहितीनुसार, पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस कर्मचारी प्रशांत चौकडे आणि इम्रान खान हे पांढरकवडा उपविभागात गस्तीवर असताना, अकोला बाजार – उंदरणी मार्गाने घोटीकडे लाल रंगाच्या कारमधून अवैध देशी दारूची मोठी खेप नेली जात असल्याची गुप्त माहिती (टीप) त्यांना मिळाली.

माहितीची खात्री पटताच पोलीस पथकाने तात्काळ पंचांना सोबत घेऊन अकोला बाजार ते घोटी मार्गावर वाहनांची झाडाझडती सुरू केली. उंदरणी ते घोटी मार्गावरील फाट्याजवळ पोलीस पथक पाळत ठेवून असताना, MH 01 AL 5120 या क्रमांकाची लाल रंगाची मारुती सुझुकी रिट्झ कार संशयितरीत्या घोटीकडे जाताना दिसली. पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून उंदरणी येथील शेताजवळ गाडी अडवली.
गाडीची झडती अन् १९ बॉक्स देशी दारू जप्त!
कारमधील संशयितांची चौकशी करून पंचांसमक्ष वाहनाची कसून झडती घेण्यात आली असता, कारमध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारूचे बॉक्स लपवून ठेवल्याचे उघडकीस आले:
‘संजीवनी’ देशी दारू: ७ बॉक्स (प्रत्येक बॉक्समध्ये ९० मिलीच्या १०० बाटल्या) – किंमत ₹२८,०००
‘टँगो’ देशी दारू: १२ बॉक्स (प्रत्येक बॉक्समध्ये ९० मिलीच्या १०० बाटल्या) – किंमत ₹४८,०००
अशा प्रकारे एकूण ७६,००० रुपये किमतीची देशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली २ लाख रुपये किमतीची मारुती रिट्झ कार, असा एकूण २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. दारूचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी (Chemical Analysis) सीलबंद करण्यात आले आहेत.
तिघांविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल!
कारमधील खालील तीन आरोपींकडे विचारणा केली असता त्यांच्याकडे दारू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले:
सचिन सुधाकर श्रीरामजवार (वय ३२, रा. पारवा, ता. घाटंजी)
गणेश मनोहर नेवारे (वय ४०, रा. अकोला बाजार, ता. यवतमाळ)
अनिकेत किसन मानकर (वय ३५, रा. अकोला बाजार, ता. यवतमाळ)
या तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (अ) (इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयपीएस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे विशेष पथक या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेते व तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

#PoliceNama #PandharkawadaPolice


28
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!