अमरावतीत संतापाची लाट: महिला पत्रकाराचा अपमान करणाऱ्या प्रवीण तोगडियांविरोधात जिल्हा कचेरीवर तीव्र निदर्शने


अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन (मनिष गुडधे) – आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाचे प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी पत्रकार परिषदेत एका महिला पत्रकाराला जात विचारून तिचा अपमान केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने आक्रमक पवित्रा घेतला असून, बुधवारी (दि. १५) जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारावर तोगडियांविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष नयन मोंढे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रवीण तोगडिया यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

घोषणाबाजीने जिल्हा कचेरी परिसर दणाणला “सावित्रीबाई फुले के देश मे महिला पत्रकारों का अपमान नही चलेगा”, “प्रवीण तोगडिया मुर्दाबाद”, “जातीयवादी प्रवीण तोगडियावर कारवाई झालीच पाहिजे” अशा घोषणांनी पत्रकारांनी जिल्हा कचेरी परिसर दणाणून सोडला होता. महिला पत्रकारांच्या सन्मानासाठी आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासाठी सर्व पत्रकार संघटनांनी यावेळी एकजूट दाखवली.

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात यावेळी माध्यमांशी बोलताना नयन मोंढे म्हणाले की, “अमरावती शहरात घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय आहे. पत्रकाराला जात विचारून त्याचा अपमान करणे हे केवळ त्या व्यक्तीचा अपमान नसून पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आणि महिलांच्या सन्मानावर केलेला आघात आहे. लोकशाहीत अशा प्रकारचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही.”

तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार यांनी प्रशासनाला इशारा दिला की, “प्रवीण तोगडिया यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी. महिला पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना आणि मार्गदर्शक तत्वे जाहीर करावीत. अन्यथा, भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

पत्रकार संघटनांची मोठी उपस्थिती या आंदोलनात जिल्हा संघटक विनोद इंगळे, स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील घटाळे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष मनीष गुडधे, महिला अध्यक्ष अर्चना रक्षे, योगिनी अडक, जया मेहरा यांच्यासह योगेश मोहकर, प्रशांत सुने, विशाल तायडे, अमोल खडसे, बंडू कुमार धवणे, सुरेश तायडे, सिद्धार्थ दामोदरे, आदेश मेटांगे, मोरेश्वर पवार आणि विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


11
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!