पुण्यात महाराणी येसुबाई जयंती आणि कारगिल विजय दिन उत्साहात संपन्न! साई डिफेन्स अकॅडमीत देशभक्ती अन् शिव-शंभू विचारांचा भव्य जागर
लोहगाव (पुणे) : पोलीसनामा दीपक धूवे
पुणे लोहगाव येथील प्रसिद्ध ‘साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी’च्या मैदानावर स्वराज्यरक्षक महाराणी येसुबाई (राजमाता राजाऊ) यांची जयंती आणि कारगिल विजय दिनाचे (२६ जुलै) औचित्य साधून भव्य संयुक्तिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी देशभक्तीसह शिव-शंभू आणि शाहू विचारांचा इतिहास जागर घडवत वीर जवानांना व स्वराज्यरक्षकांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
प्रतिमा पूजन आणि अमर जवान स्मारकास मानवंदना
कार्यक्रमाची सुरुवात स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत राजे पिलाजीराव शिर्के यांच्या राजकन्या, शिवस्नुषा, शाहूमाता, शंभुपत्नी आणि स्वराज्याच्या दुसऱ्या कुलमुखत्यार महाराणी येसुबाई यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली.
त्यानंतर कारगिल विजय दिनानिमित्त देशाच्या सीमेचे रक्षण करताना प्राणांची आहुती देणाऱ्या अमर शहीदांच्या ‘अमर जवान’ स्मारकास मानवंदना देऊन जवानांच्या शौर्याला उजाळा देण्यात आला.
“राष्ट्रप्रथम हीच खरी देशसेवा” – मान्यवरांचे मार्गदर्शन
यावेळी उपस्थित वक्त्यांनी कारगिल युद्धातील भारतीय सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमाचा इतिहास मांडला. तसेच छत्रपतींच्या स्वराज्याचा वारसा अत्यंत कठीण प्रसंगातही खंबीरपणे सांभाळणाऱ्या त्यागमूर्ती महाराणी येसुबाई यांच्या तेजोमय इतिहासावर प्रकाश टाकला. अकॅडमीतील भावी सैनिक व पोलीस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “राष्ट्रप्रथम” (Nation First) हीच खरी देशसेवा असल्याचे सांगून देशसेवेसाठी प्रेरित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ‘जय हिंद’, ‘जय भारत’, ‘जय महाराष्ट्र’, ‘जय जिजाऊ’, ‘जय राजाऊ’, ‘जय शिवराय’, ‘जय शंभुराजे’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या संयुक्तिक कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (माजी सैनिक सेल) चे प्रदेशाध्यक्ष तथा शंभुसेना प्रमुख मा. दीपकराजे शिर्के, उपाध्यक्ष श्रीमंत राठोड, माजी सैनिक चंद्रकांत गायकवाड, प्रा. राहुल गुज्जर, ओम प्रभात सूर्यवंशी, मंगेश सरकाते, आप्पा बसर्गी आणि रुपाली सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच आजी-माजी सैनिक, शिव-शंभुभक्त, राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे पदाधिकारी, अकॅडमीचा शिक्षक वर्ग व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















