पोलीसनामा विशेष वृत्त
उंड्रीत धक्कादायक प्रकार! कायदेशीर घटस्फोट न घेता पतीचे दुसरे लग्न; पीडित महिला ६ वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत, न्यायालयात खटला सुरू
पुणे (उंड्री) – समाधान अडसूळ पोलीसनामा वार्ताहर:
पुण्यातील उंड्री परिसरात एक धक्कादायक कौटुंबिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. पहिल्या पत्नीला रीतसर व कायदेशीर घटस्फोट न देताच पतीने दुसरे लग्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हतबल झालेली पीडित महिला गेल्या ६ वर्षांपासून न्यायासाठी लढा देत असून, सध्या हे प्रकरण न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
लग्नानंतर काही वर्षांतच नकार; थेट थाटला दुसरा संसार
मिळालेल्या माहितीनुसार, पूनम मुरली मगर यांचा विवाह १६ मे २०१७ रोजी मुरली लिंबाजी मगर यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच मुरली मगर यांनी पूनम यांना सोबत नांदवण्यास स्पष्ट नकार दिला. धक्कादायक बाब म्हणजे, कायदेशीररित्या कोणताही घटस्फोट न घेता मुरली मगर यांनी दुसरे लग्न देखील केले. त्यांना या दुसऱ्या पत्नीपासून दोन अपत्ये असल्याचेही आता समोर आले आहे. सध्या आरोपी पती उंड्री चौकातील अतूर नगर (पुणे) येथे वास्तव्यास आहे.
पोलीस प्रतिसाद न मिळाल्याने न्यायालयाचे दार थोटावले
या अन्यायाविरुद्ध पीडित महिला पूनम यांचे बंधू अक्षय अंकुश निरगुडे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी सुरुवातीला सांगवी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करून सखोल तपासाची मागणी केली होती. मात्र, पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद व मदत न मिळाल्याने त्यांनी अखेर न्यायालयाचा मार्ग निवडला.
सध्या हे संपूर्ण प्रकरण पिंपरी न्यायालयात भारतीय दंड विधान (IPC) कलम ४९८ अंतर्गत दाखल असून, खडकी न्यायालयात घरगुती हिंसाचार (डोमेस्टिक व्हायलन्स) कायद्यान्वये कायदेशीर सुनावणी सुरू आहे.
भावाचा ६ वर्षांपासून पाठींबा; कठोर कारवाईची मागणी
गेल्या ६ वर्षांपासून हतबल झालेल्या पूनम यांचा संपूर्ण सांभाळ त्यांचे भाऊ अक्षय निरगुडे हेच करत आहेत. पतीने कायदेशीर प्रक्रियेला बगल देऊन फसवणूक केल्यामुळे, या प्रकरणात संबंधित पीडित महिलेला त्वरित न्याय मिळावा आणि दोषी पतीवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी आग्रही मागणी तक्रारदार कुटुंबाकडून केली जात आहे.
















