थलापती विजय यांचा ‘मास्टरस्ट्रोक’! तामिळनाडूतील शाळा, मंदिरे आणि रुग्णालयांजवळील ७१७ दारूची दुकाने कायमची बंद;


थलापती विजय यांचा ‘मास्टरस्ट्रोक’! तामिळनाडूतील शाळा, मंदिरे आणि रुग्णालयांजवळील ७१७ दारूची दुकाने कायमची बंद; महसुलापेक्षा सामाजिक हिताला प्राधान्य

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाईन – तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री थलापती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच लोकहिताच्या निर्णयांचा धडाका लावला आहे. २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या ऐतिहासिक घोषणेनंतर, आता त्यांनी राज्यातील दारूविक्रीबाबत अत्यंत कठोर आणि धाडसी पाऊल उचलले आहे. शाळा, मंदिरे, रुग्णालये आणि बसस्थानकांच्या परिसरात असलेल्या ७१७ सरकारी दारूच्या दुकानांना तातडीने टाळे ठोकण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

२ आठवड्यांच्या आत अंमलबजावणी

मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि बसस्थानकांच्या ५०० मीटरच्या परिघात येणारी ७१७ किरकोळ दारूची दुकाने पुढील दोन आठवड्यांच्या आत बंद केली जातील. तामिळनाडू राज्य विपणन महामंडळ (TASMAC) सध्या राज्यात एकूण ४,७६५ दुकाने चालवते, ज्यातून राज्याला वार्षिक ४८,००० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळतो. मात्र, महसुलापेक्षा नव्या पिढीचे भविष्य आणि सामाजिक स्वास्थ्य महत्त्वाचे असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.

कुठे किती दुकाने होणार बंद?

मिळालेल्या माहितीनुसार, बंद होणाऱ्या ७१७ दुकानांची विभागणी खालीलप्रमाणे आहे:

प्रार्थनास्थळांजवळ: २७६ दुकाने

शैक्षणिक संस्थांजवळ: १८६ दुकाने

बसस्थानकांजवळ: २५५ दुकाने

महिला वर्गात आनंदाचे वातावरण

मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या या निर्णयाचे तामिळनाडूमध्ये सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. विशेषतः महिला वर्गामध्ये या निर्णयामुळे मोठा आनंद व्यक्त केला जात असून, व्यसनमुक्त तामिळनाडूच्या दिशेने हे पहिले मोठे पाऊल मानले जात आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, केवळ तिजोरी भरण्याचा विचार न करता जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर थेट घाला घालून विजय यांनी आपला प्रशासकीय दबदबा निर्माण केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील गुन्हेगारीवरही अंकुश बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


18
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!