तात्काळ दर्शना’वरून महिला पुजारी अन् पतीला कुऱ्हाडीचा धाक दाखवत बेदम मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल, पण आरोपी अजूनही मोकाटच!


उरुळी कांचन हादरले! नायगावच्या काळभैरवनाथ मंदिरात ‘तात्काळ दर्शना’वरून महिला पुजारी अन् पतीला कुऱ्हाडीचा धाक दाखवत बेदम मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल, पण आरोपी अजूनही मोकाटच!

पोलीसनामा (पुणे) : उरुळी कांचन हादरले! नायगावच्या काळभैरवनाथ मंदिरात ‘तात्काळ दर्शना’वरून महिला पुजारी अन् पतीला कुऱ्हाडीचा धाक दाखवत बेदम मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल, पण आरोपी अजूनही मोकाटच! उरुळी कांचन जवळील नायगाव (ता. हवेली) येथील ऐतिहासिक श्री काळभैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. मंदिरात तात्काळ दर्शन देण्याच्या शुल्लक कारणावरून मंदिराच्या महिला पुजारी आणि त्यांच्या पतीला एकाच कुटुंबातील ५ जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर, हातात धारदार कुऱ्हाड घेऊन संपूर्ण कुटुंबाला जिवंत कापून टाकण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा तर दाखल झाला आहे, मात्र घटना घडून दोन दिवस उलटले तरी आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने पोलिसांच्या संथ कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याप्रकरणी सुनिता निलेश भैरवकर (वय ४५, रा. नायगाव, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दादा पिराजी थोरात, मछिंद्रनाथ दादा थोरात, शलाका पिराजी थोरात, रोहिणी दादा थोरात आणि धनश्री दादा थोरात (सर्व रा. नायगाव) अशा एकाच कुटुंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ३ महिलांचा समावेश आहे.

नक्की काय घडली घटना? ‘तात्काळ दर्शना’वरून वाद!

वादाचे कारण अत्यंत शुल्लक होते. रविवार (दि. २४ मे) रोजी सायंकाळी ७ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुनीता भैरवकर या काळभैरवनाथ मंदिरात धार्मिक विधी व पूजेचे काम पाहत असताना, आरोपी दादा थोरात हा आपल्या कुटुंबासह तिथे आला. त्यांनी “आम्हाला मंदिरात तात्काळ दर्शन का दिले नाही?” याच शुल्लक कारणावरून महिला पुजारी व त्यांच्या पतीला थेट अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भैरवकर दाम्पत्याने या शिवीगाळीला विरोध केला असता, आरोपींनी संतप्त होऊन त्यांना पकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी एका आरोपीने थेट सुनीता यांच्या पतीच्या नाकावर दगड मारला, ज्यामुळे ते रक्ताळले. एवढ्यावरच न थांबता आरोपी दादा थोरात याने महिला पुजाऱ्याचा विनयभंग केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याच वेळी वाद विकोपाला गेल्याने मछिंद्रनाथ थोरात याने थेट हातात धारदार कुऱ्हाड घेतली आणि ती हवेत फिरवत “तुम्हाला कुऱ्हाडीने कापून जिवंत मारून टाकू”, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने भैरवकर यांच्या घरात घुसून त्यांच्या मुलालाही जीवे मारण्याची धमकी दिली.

गुन्हा नोंदवला, पण कारवाई शून्य; आरोपी कधी पकडणार?

या जीवघेण्या हल्ल्यानंतर जखमी भैरवकर दाम्पत्याने रुग्णालयात उपचार घेतले आणि उरुळी कांचन पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा तर दाखल करून घेतला आहे, पण नेहमीप्रमाणे पोलिसांची कारवाई कागदावरच मर्यादित राहिल्याचे दिसत आहे.

‘पोलीसनामा’चा सवाल :

मंदिरात केवळ ‘तात्काळ दर्शन’ दिले नाही म्हणून थेट महिला पुजारी आणि तिच्या पतीला कुऱ्हाड दाखवून मारहाण होते, घरात घुसून मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली जाते, तरीही उरुळी कांचन पोलीस इतके थंड का? ५-५ आरोपी उजळ माथ्याने गावात फिरत असताना पोलिसांनी अजून एकालाही बेड्या का ठोकल्या नाहीत? कायदा-सुव्यवस्थेचा साठी प्रयत्न का नाही?

या घटनेमुळे नायगाव परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण असून, पीडित कुटुंब अद्यापही भीतीच्या छायेखाली आहे. आता तरी उरुळी कांचन पोलीस आपली झोप उडवून या गुंडांना तात्काळ अटक करणार की आरोपींना पाठीशी घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार लगस करत आहेत.

 


जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

25
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

error: Content is protected !!