खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा? धामणगाव रेल्वे परिसरात रस्त्यांची अतिशय दैनीय अवस्था; ‘प्रहार’ने खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून प्रशासनाला झापले!
अमरावती पोलीसनामा – विक्रम उईके –
“खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा?” असा संतप्त सवाल विचारण्याची वेळ सध्या अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर ते चिंचपूर, पिंपळखुटा आणि अंजनसिंगी रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांवर आली आहे. या मुख्य रस्त्याची कमालीची दुरवस्था झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र उघड्या डोळ्यांनी झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप केला जात आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून तीव्र निषेध नोंदवला.
विद्यार्थी अन् शेतमजुरांचे अतोनात हाल!
मंगरुळ दस्तगीर ते अंजनसिंगी या मार्गावरून रोज शेकडो विद्यार्थी, नागरिक आणि शेतमजूर प्रवास करतात. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या भव्य खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत आहेत. संत शंकर महाराज शाळा आणि मदर टेरेसा शाळेतील विद्यार्थ्यांना या जीवघेण्या खड्ड्यातून प्रवास करावा लागत असून, त्यांची मोठी गैरसोय होत आहे. तरीही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बेशरमाची झाडे लावून प्रशासनाचा अनोखा निषेध!
प्रशासनाला जागे करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख सुरज गंथडे यांच्या नेतृत्वाखाली प्रहारचे पदाधिकारी, अंजनसिंगी, पिंपळखुटा, चिंचपूर येथील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये ‘बेशरमाची झाडे’ लावून अनोखे आंदोलन केले व नवीन रस्ता तात्काळ तयार करण्याची जोरदार मागणी केली.
१५ दिवसांत काम सुरू न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा!
याप्रसंगी तालुकाप्रमुख सुरज गंथडे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की, “येत्या १५ दिवसांच्या आत या रस्त्याचे रीतसर काम सुरू करण्यात आले नाही, तर प्रहार जनशक्ती पक्ष, सर्व पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ मिळून प्रशासनाविरोधात आमरण उपोषणाला बसतील.”
या आंदोलनादरम्यान आशिष मानकर, रोशन रुद्रकार, ओमकार हलमारे, मंगेश कडू, प्रफुल कडू, विनोद गायके, प्रवीण खोडे, बंटी चौधरी, प्रतिक हरगुडे, निकेश मारबदे, शंकर मेश्राम, जीवन तुमसरे, रंजीत गुडदे, प्रशांत मडामे, नितेश अमझरे, ओम गावंडे, अंकुश राऊत, महेश खवास, योगेश ठोसर, शुभम गावंडे, पवन निकम यांच्यासह संत शंकर महाराज शाळा व मदर टेरेसा शाळेतील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता तरी व्यक्त व्हा!
तुमच्याही भागात रस्त्यांची अशीच बिकट अवस्था आहे का? प्रशासनाने या खड्ड्यांकडे तात्काळ लक्ष देऊन रस्ता दुरुस्त केला पाहिजे का? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा! 😡👇















