पोलीसनामा अमरावती (आदेश पाठक ) – अमरावती शहरातील काँग्रेस भवन परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करणाऱ्या सराईत आरोपींना फ्रेजरपुरा पोलीस आणि डी.बी. पथकाने अवघ्या ६ तासांत जेरबंद केले आहे. अमरावती शहर, ग्रामीण भाग तसेच यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री २:५४ वाजेच्या सुमारास फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खुशाल तायवाडे हे रात्रकालीन गस्तीवर असताना, त्यांना काँग्रेस भवन येथे एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता जखमीला उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजले.
रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता जखमी तरुणाचे नाव शेख सोहेल शेख सलीम (वय ३६, रा. आकोट फैल, अकोला) असे असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक तपासात पैशांच्या वादातून आरोपी बादल बागवाले (रा. महाजनपुरा, अमरावती), हरीश विनोद बोबडे (रा. शाम नगर, अमरावती) आणि त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून सोहेल याच्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याचे उघड झाले.
वैद्यकीय अहवालानंतर गुन्हा दाखल
हल्ल्यामध्ये जखमी सोहेल याच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, हनुवटीवर, ओठावर आणि दोन्ही हातांवर गंभीर वार करण्यात आले होते. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने तो जबाब देण्याच्या स्थितीत नव्हता. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर पोलिसांनी परतर्फे तक्रार नोंदवून आरोपींविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ४३८/२०२६, कलम १०९(१), ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल केला.
६ तासांत वेगवेगळ्या ठिकाणांवरून मुसक्या आवळल्या
घटनेचे गांभीर्य ओळखून डी.बी. पथकाने तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सी.सी.टी.व्ही. फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवली.
पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींचा मागोवा घेत पोलिसांनी अमरावती शहर हद्द, अमरावती ग्रामीण हद्दीतील ग्राम लाखनवाडी आणि यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथून वेगवेगळ्या ठिकाणांवरून आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक
सदरची उत्कृष्ट कामगिरी पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, तपास अधिकारी, डी.बी. प्रमुख आणि पोलीस अंमलदार व चालकांच्या पथकाने उच्च दर्जाचे व्यावसायिक कौशल्य दाखवून पार पाडली.















