पोलीसनामा यवतमाळ – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यू. बघेले यांच्या न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची ठोकठावली आहे. गुरुदेव देविदास मडावी (वय २५, रा. पार्डी नस्करी, ता. घाटंजी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
चॉकलेटचे आमिष दाखवून केला अत्याचार
ही धक्कादायक घटना ६ मार्च २०२४ रोजी सकाळी घडली होती. पीडित १० वर्षीय चिमुकलीचे वडील शेतात मजुरीसाठी गेले असताना, घरात ती एकटीच होती. हीच संधी साधून आरोपी गुरुदेव मडावी याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवले आणि गावातील एका बंद शाळेच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. चिमुकलीने आरडाओरड केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
२ वर्षांत लागला निकाल; ७ साक्षीदार ठरले महत्त्वाचे
पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पांढरकवडा येथील तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर राजेंद्र वेंजने यांनी या प्रकरणाचा वेगाने व सखोल तपास करून न्यायालयात सबळ दोषारोपपत्र दाखल केले.
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने ७ महत्त्वाचे साक्षीदार तपासले. सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या गवाहीवरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत २० वर्षांची सक्तमजुरी सुनावली. तसेच पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्याकडून आर्थिक नुकसानभरपाई देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ऍड. संदीप अ. दर्डा यांनी प्रभावी बाजू मांडली, तर घाटंजी पोलीस ठाण्याच्या सारिका बोधनकर यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले.














