पोलीसनामा ऑनलाईन – आगामी गणेशोत्सवाच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घाटंजी पोलिसांच्या वतीने सोमवारी (दि. २२ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता शहरात दणकेबाज पथसंचलन (रूट मार्च) करण्यात आले. यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक पूर्णपणे शांततेत आणि डीजे-मुक्त वातावरणात पार पाडण्यावर पोलीस प्रशासनाचा विशेष भर असणार आहे.
प्रमुख मार्गांवरून पोलिसांचा ताफा
पोलीस स्टेशन चौकातून सुरू झालेले हे पथसंचलन जुना बसस्थानक, जामा मशीद रोड, शिवाजी चौक या प्रमुख मार्गांवरून जात पुन्हा पोलीस स्टेशन परिसर येथे समाप्त झाले. या रूट मार्चच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करत सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
डीजेमुक्त विसर्जनासाठी प्रशासनाचे आवाहन
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे व सूचनांचे तंतोतंत पालन करून गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करावा, असे आवाहन ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी केले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि पांढरकवडा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन पार पडले.
या रूट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक केशव ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राठोड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार, पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गणेशोत्सवाच्या काळात शहरात सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी घाटंजी पोलीस पूर्णपणे सज्ज असल्याचे या पथसंचलनातून दिसून आले.

















