सरकारी नोकरीच्या नावाखाली ६ लाखांचा गंडा; अन्न पुरवठा विभागात ‘निरीक्षक’ बनवण्याचे आमिष, छत्रपती संभाजीनगरच्या भामट्यावर गुन्हा दाखल!


घाटंजीत सरकारी नोकरीच्या नावाखाली ६ लाखांचा गंडा; अन्न पुरवठा विभागात ‘निरीक्षक’ बनवण्याचे आमिष, छत्रपती संभाजीनगरच्या भामट्यावर गुन्हा दाखल!

घाटंजी : पोलीसनामा ऑनलाइन (अयनुद्दीन सोलंकी) –

अन्न व नागरी पुरवठा विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका सुशिक्षित बेरोजगाराची ६ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घाटंजी तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विलास मगरे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी विलास मगरे (वय ४०, रा. देवळी, छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI विनाश जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नेमका काय आहे प्रकार?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनिकेत देविदास तामगाडगे (वय २८, रा. कुऱ्हाड, ता. घाटंजी, जि. यवतमाळ) हा बी.एड.चे शिक्षण घेत होता. सन २०२३ मध्ये मोबाईलद्वारे त्याची ओळख आरोपी विलास मगरे याच्याशी झाली. “माझी मंत्रालयातील आणि मोठ्या राजकीय व्यक्तींशी थेट ओळख असून मी कोणतीही सरकारी नोकरी लावून देऊ शकतो,” अशी थाप मारून मगरे याने अनिकेतला आपल्या जाळ्यात ओढले.

३० लाखांची डील, ५ लाख टोकन!

संशयित आरोपीने अनिकेतला अन्न पुरवठा विभागात “अन्न पुरवठा निरीक्षक” (Food Supply Inspector) या पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी तब्बल ३० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आणि सुरुवातीला टोकन म्हणून ५ लाख रुपये मागितले. २५ जानेवारी २०२४ रोजी आरोपी विलास मगरे हा स्वतः तक्रारदाराच्या घरी आला. त्यावेळी अनिकेतने आपल्या नातेवाईकाच्या बँक खात्यातून आर.टी.जी.एस. (RTGS) द्वारे आरोपीच्या खात्यात ५ लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले.

त्यानंतर ‘ऑर्डर लवकरच निघणार आहे’ असे सांगत आरोपीने आणखी पैशांची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने स्वतःच्या आणि भावाच्या फोन-पे (PhonePe) खात्यातून एकूण १ लाख ५ हजार रुपये आरोपीला पाठवले.

‘ना नोकरी मिळणार, ना पैसे!’

पैसे घेतल्यानंतर आरोपी सतत ‘आज ऑर्डर निघेल, उद्या नोकरी लागेल’ असे सांगून वेळ काढत होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी जेव्हा तक्रारदाराने नोकरीबाबत किंवा पैसे परत करण्याबाबत तगादा लावला, तेव्हा आरोपीने आपला खरा रंग दाखवला. “ना नोकरी मिळेल, ना पैसे परत मिळतील, काय करायचे ते करून घे,” अशी उघड धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनिकेत तामगाडगे याने घाटंजी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

पोलिसांनी प्राथमिक चौकशी अंती आरोपी विलास मगरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८ (४) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

‘पोलीसनामा’ विशेष : कारवाई झालीच पाहिजे, पण नाण्याची दुसरी बाजूही तपासा!

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अशा प्रकारे लाखो रुपयांची लाच देण्याची तयारी ठेवणे हा सुद्धा एक गंभीर गुन्हाच आहे. आज जर आरोपीने खरंच नोकरी लावून दिली असती, तर तक्रारदाराने हा व्यवहार कधीच उघड केला नसता, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

आज समाजात असे कित्येक लोक सरकारी यंत्रणेत घुसले आहेत, ज्यांनी लाखो रुपयांची देवाणघेवाण करून पदे मिळवली आहेत आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा आणली आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ पैसे घेणाऱ्यावरच नाही, तर ‘शॉर्टकट’ने नोकरी मिळवण्यासाठी लाखो रुपयांची लाच देणाऱ्याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी जाहीर मागणी आता सुशिक्षित बेरोजगार आणि नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.


28
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!