इंधन वाचवा, स्वदेशी स्वीकारा’; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईत विद्यार्थिनींची धडक जनजागृती रॅली
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (गुरुदत्त वाकदेकर) –
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या संभाव्य इंधन तुटवड्यावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. इंधन बचत, स्वदेशीचा स्वीकार आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याच्या या राष्ट्रीय आवाहनाला प्रतिसाद देत, माटुंगा येथील श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एका भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करून मुंबईकरांना सामाजिक संदेश दिला.
सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्रसेना (NCC) विभागाच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
घोषणांनी परिसर दुमदुमला
हातात “इंधन वाचवा”, “स्वदेशी स्वीकारा”, “सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा” आणि “अनावश्यक परदेश प्रवास टाळा” अशा आशयाचे प्रभावी फलक आणि बॅनर्स घेऊन विद्यार्थिनी रॅलीत सहभागी झाल्या होत्या. महाविद्यालय परिसरापासून सुरू झालेली ही जनजागृती फेरी महेश्वरी उद्यान, खालसा महाविद्यालय आणि डॉन बॉस्को शाळा परिसरापर्यंत काढण्यात आली. रॅलीदरम्यान विद्यार्थिनींनी ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रीय जबाबदारी याविषयी नागरिकांमध्ये थेट संवाद साधून जनजागृती केली.
नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव
सुट्टीचा कालावधी असतानाही विद्यार्थिनींनी देशहितासाठी दाखवलेल्या या उत्साहाचे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थिनींच्या शिस्तबद्ध सहभागामुळे आणि घोषणाबाजीमुळे संपूर्ण माटुंगा परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.
प्राचार्यांकडून कौतुक
महाविद्यालयाच्या प्राचार्या अर्चना पत्की यांनी विद्यार्थिनींच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. “शैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यार्थिनींमध्ये सामाजिक जाणीव, राष्ट्रीय कर्तव्यभावना आणि पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता विकसित होणे ही काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या राष्ट्रीय उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी रेखा शेलार, सोनी सिंह, केजल धनधुकिया, लेफ्टनंट सुवर्णा जोशी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले. या रॅलीत एकूण ३० विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदवून आपला सामाजिक संदेश पोहोचवला.















