पत्रकार कासम शाह यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याचा ‘पोलीसनामा’ व ‘स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघटने’कडून तीव्र निषेध! IPS निकेतन कदम यांना दिले निवेदन; आरोपींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
लोणी (अमरावती) | पोलीसनामा आदेश पाठक –
पत्रकार कासम शाह इमाम शाह यांच्यावर लोखंडी रॉडने करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या आणि त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याच्या विरोधात ‘पोलीसनामा’, ‘स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघटना’ तसेच सर्व पत्रकारांनी एकत्र येत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. या भ्याड हल्ल्याचा आणि खोट्या गुन्ह्याचा ‘पोलीसनामा’ व सर्व पत्रकार बांधव जाहीर निषेध करत आहेत. याप्रकरणी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने आयपीएस अधिकारी निकेतन कदम (IPS Niketan Kadam) यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
नेमकी घटना काय?
अमरावती जिल्ह्यातील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनना येथील रहिवासी मनोहर नरखेडकर आणि त्यांच्या मुलाने बातमीचे संकलन करण्यासाठी गेलेले पत्रकार कासम शाह यांच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला.
बातमी गोळा करताना बेदम मारहाण: केवदे आणि नरखेडकर यांच्यातील जमिनीच्या वादाबाबत दोन्ही बाजूंची मते जाणून घेण्यासाठी कासम शाह गेले होते. ग्रामसेवक जयश्री काकडे (जुनना) यांना निवेदन देऊनही केवदे यांच्या वडिलोपार्जित मालकीच्या जमिनीवर नरखेडकर परिवाराचे बेकायदेशीर बांधकाम सुरू होते. या अवैध बांधकामाची सत्य बातमी गोळा करण्यासाठी गेले असता, मनोहर नरखेडकर आणि त्यांच्या मुलाने पत्रकार कासम शाह यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.
उलट खोटा गुन्हा दाखल: मारहाण केल्यानंतर आरोपी नरखेडकर परिवाराने ‘पत्रकार घरात घुसले’ असा बनाव रचून कासम शाह यांच्याविरोधातच लोणी पोलीस ठाण्यात उलट खोटा गुन्हा नोंदवला.
पत्रकार संघटना व ‘पोलीसनामा’चा एल्गार!
या घटनेनंतर स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघटना, ‘पोलीसनामा’ आणि अमरावती व परिसरातील सर्व पत्रकारांनी एकत्र येत या घटनेचा कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. आयपीएस अधिकारी निकेतन कदम यांना दिलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
१. पत्रकार सुरक्षा कायदा लागू करा: पत्रकार कासम शाह यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करणाऱ्या मनोहर नरखेडकर व त्यांच्या मुलावर ‘पत्रकार सुरक्षा कायद्या’अंतर्गत तात्काळ कडक गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी.
२. खोटा गुन्हा रद्द करा: पत्रकाराचा आवाज दाबण्यासाठी व स्वतःचा बचाव करण्यासाठी नरखेडकर परिवाराने लोणी पोलीस ठाण्यात दाखल केलेला खोटा गुन्हा तात्काळ रद्द करण्यात यावा.
३. आमरण उपोषणाचा इशारा: जर पोलीस प्रशासनाने आरोपींवर तात्काळ व कठोर कारवाई केली नाही, तर पत्रकार संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडून आमरण उपोषण केले जाईल.
पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांवर प्रशासनाने कडक पावले उचलावीत!
सत्य बातम्या समोर आणणाऱ्या पत्रकारांवर होणारे भ्याड हल्ले आणि त्यांच्यावर दाखल होणारे खोटे गुन्हे लोकशाहीचा गळा घोटणारे आहेत. ‘पोलीसनामा’ या घटनेचा तीव्र निषेध करत असून, या प्रकरणात पोलीस प्रशासन काय ठोस कारवाई करते याकडे संपूर्ण राज्यातील पत्रकारांचे लक्ष लागले आहे.















