गुटखा तस्करीच्या खोट्या गुन्ह्याची भीती दाखवून ९० हजारांची लाच घेणारा पोलीस अंमलदार ‘एसीबी’च्या जाळ्यात; नाशिक ग्रामीण पोलीस दलात खळबळ
नाशिक | विक्रम उईके पोलीसनामा – कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या परराज्यातील चिकन व्यावसायिकाला गुटखा तस्करीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन ९० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. मनोज दगू गायकवाड (वय ३७) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव असून, तो पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. या धडक कारवाईमुळे नाशिक ग्रामीण पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार हे गुजरातमधील सुतारपाडा येथील रहिवासी असून, ते चिकन विक्रीचा व्यवसाय करतात. ते महाराष्ट्रातून कोंबड्यांची खरेदी करून स्वतःच्या वाहनाने गुजरातला नेतात. जून महिन्यात अशीच वाहतूक सुरू असताना, पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांगणी परिसरात पोलीस अंमलदार मनोज गायकवाड याने त्यांची गाडी रोखली.
गाडीत कोंबड्या असल्याचे स्पष्ट दिसत असूनही, “तू गुटख्याची बेकायदेशीर तस्करी करतोस, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो,” अशी भीती गायकवाडने तक्रारदाराला दाखवली. त्यावेळी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्याने तक्रारदाराकडून ६० हजार रुपये उकळले होते.
भविष्यातील ‘प्रोटेक्शन’साठी मागितली लाच!
एवढ्यावरच न थांबता, आरोपी पोलीस अंमलदाराने तक्रारदाराशी पुन्हा संपर्क साधला. भविष्यात कोंबड्यांच्या गाड्यांवर कोणतीही पोलीस कारवाई न करण्यासाठी आणि वाहने विनाअडथळा सोडून देण्यासाठी त्याने थेट एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. अखेर तडजोडीअंती ९० हजार रुपये देण्याचे ठरले.
एसीबीचा सापळा आणि रंगेहाथ अटक
पोलीस अंमलदाराच्या सततच्या पैशांच्या त्रासाला कंटाळून अखेर चिकन व्यावसायिकाने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) धाव घेत रीतसर तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने प्राप्त तक्रारीची गुप्तपणे पडताळणी केली. लाच मागणीची खात्री पटल्यानंतर पथकाने पेठ परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ९० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना पोलीस अंमलदार मनोज गायकवाड याला एसीबीने रंगेहाथ बेड्या ठोकल्या.
याप्रकरणी आरोपी पोलिसाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एसीबीचे अधिकारी करत आहेत.















