विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही! तुकाराम मुंढेंच्या एका आदेशाने शाळा आणि कँटीन चालकांचे धाबे दणाणले; ‘स्टिंग’वरही बंदी!
पुणे, १३ जुलै ( दीपक धुवे पोलीसनामा ऑनलाईन) –
राज्यात अन्नभेसळीच्या वाढत्या प्रकरणांना चाप लावण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) ॲक्शन मोडमध्ये आले आहे. आता एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडे वळवला आहे. शाळांमधील उपहारगृहे (Canteens) आणि मध्यान्ह भोजनाच्या (Mid-day Meal) गुणवत्तेची कडक तपासणी करण्याचे थेट आदेश मुंढे यांनी दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या ताटात स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक अन्नच पडले पाहिजे, या उद्देशाने एफडीएने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मुंबईत शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या संस्थांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शाळांना अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
चुकीला माफी नाही; थेट कारवाई होणार!
मागील काही दिवसांत राज्यातील विविध शाळांमध्ये मध्यान्ह भोजनात अळ्या किंवा निकृष्ट दर्जाचे अन्न आढळल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर एफडीएचे सहाय्यक आयुक्त पी. आर. सिंगारवाड यांनी स्पष्ट केले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा किंवा अन्न पुरवठादारांवर कोणतीही दया न दाखवता थेट कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
शाळांच्या आवारात ‘स्टिंग’ बंदी!
या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभेत झालेल्या चर्चेनंतर, शाळांच्या ५०० मीटर परिसरामध्ये ‘स्टिंग’ (Sting) या ऊर्जा पेयाच्या (Energy Drink) विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
अशी करा तक्रार:
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शाळा किंवा इतर कोणत्याही ठिकाणी अन्नभेसळ अथवा अस्वच्छतेचा संशयास्पद प्रकार आढळल्यास त्यांनी तात्काळ 1800222365 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी.















