दौंडमध्ये शाळकरी बहिणींचा ८ दिवस पाठलाग अन् पारगाव चौकात रस्ता अडवून छेडछाड; यवत पोलिसांकडून दोन्ही विकृतांना बेड्या!
यवत/दौंड (विशेष वृत्त) : दीपक धूवे पोलीसनामा पुणे विभाग
शाळेतून घरी परतणाऱ्या अवघ्या १२ वर्षांच्या दोन अल्पवयीन बहिणींचा सलग ८ दिवस इको कारमधून पाठलाग करून, पारगाव चौकात गाडी आडवी लावून त्यांचा विनयभंग करणाऱ्या दोन विकृतांना यवत पोलिसांनी तातडीने मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना बेड्या ठोकल्या असून परिसरात समाधान व्यक्त होत आहे. अटक आरोपींची नावे व ठिकाण:
प्रविण गणपत थोरात (रा. खुटबाव, ता. दौंड, जि. पुणे)
दिनेश दत्तात्रय पासलकर (रा. खुटबाव, ता. दौंड, जि. पुणे)
गुन्ह्यात वापरलेले वाहन: मारुती इको कार (क्र. MH 42 BS 8535)
नेमकी घटना आणि धक्कादायक प्रकार:
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारगाव चौक परिसरात हा संतापजनक प्रकार घडला. पीडित १२ वर्षीय दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणी दररोज शाळेतून पायी घरी परतत असत. आरोपी प्रविण थोरात आणि दिनेश पासलकर हे गेल्या ८ दिवसांपासून त्यांच्या ताब्यातील इको कारने (MH 42 BS 8535) या चिमुरड्यांचा सातत्याने पाठलाग करत होते.
दरम्यान, २० जुलै आणि २७ जुलै रोजी आरोपींनी पारगाव चौकात हद्द पार केली. त्यांनी मुलींचा थेट रस्ता अडवत गाडी समोर आडवी लावली. आरोपी प्रविण थोरात याने कारमधून खाली उतरून अयोग्य वक्तव्य करत एका मुलीचा डावा हात पकडून तिला स्वतःकडे ओढले. तर आरोपी दिनेश पासलकर याने दुसऱ्या बहिणीचा हात धरून तिला अंगावर ओढून घेत लज्जास्पद कृत्य केले.
पालकांची पोलिसांत धाव; तात्काळ कारवाई
सततच्या या त्रासाला वैतागून आणि घाबरलेल्या अवस्थेत पीडित मुलींनी घरी पोहोचून संपूर्ण आपबिती पालकांना सांगितली. पालकांनी क्षणाचाही विलंब न लावता यवत पोलीस ठाणे गाठले.
पीडित मुलीच्या तक्रारीवरून यवत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमे आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (POCSO – पॉक्सो) गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी खुटबाव परिसरात छापा टाकून दोन्ही आरोपींना जेरबंद केले.
पोलीस यंत्रणा व पुढील तपास:
सदर गुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा गोसावी यांनी दाखल करून घेतला असून, प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज करत आहेत. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.














