१० वर्षांपासून तलाठी कार्यालयाला कुलूप! बोरगाव (धांदे) येथे शेतकरी अन् महिलांचे अतोनात हाल; प्रशासन गार झोपेत?


१० वर्षांपासून तलाठी कार्यालयाला कुलूप! बोरगाव (धांदे) येथे शेतकरी अन् महिलांचे अतोनात हाल; प्रशासन गार झोपेत?

बोरगाव (धांदे) | अमरावती प्रतिनिधी ; विक्रम उईके पोलीसनामा विशेष बातमी – शासन एकीकडे ‘प्रशासन जनतेच्या दारी’ असल्याच्या मोठ्या बाता मारत असले, तरी प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागात वास्तव अत्यंत भीषण आहे. अकोला जिल्ह्यातील बोरगाव (धांदे) येथील तलाठी कार्यालय गेल्या तब्बल दहा वर्षांपासून कुलूपबंद अवस्थेत आहे. जनतेच्या कष्टाच्या आणि कराच्या पैशातून बांधलेली ही शासकीय इमारत धूळ खात पडली असून, या गंभीर बाबीकडे कृषी व महसूल विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

तण वाढले, परिसरात भीतीचे वातावरण!

कृषी तसेच महसूल विषयक विविध कामांसाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर तलाठी कार्यालयाची निर्मिती केली, जेणेकरून शेतकरी आणि ग्रामस्थांची कामे एकाच ठिकाणी व्हावीत. मात्र, बोरगाव (धांदे) येथील तलाठी कार्यालय मागील दशकापासून बंद असल्याने इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर तण व झुडपे वाढली आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, लगतच्या इतर गावांमध्ये तलाठी कार्यालये सुस्थितीत सुरू असून तेथे सर्व कामे सुरळीत पार पडतात, मग बोरगाव (धांदे) बाबतीतच हा दुजाभाव का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

ग्रामस्थांचे प्रशासनाला थेट सवाल!

या कुलूपबंद कार्यालयामुळे शेतकरी, नागरिक आणि विशेषतः महिला वर्गाची मोठी अडचण होत आहे. संतप्त गावकऱ्यांनी प्रशासनाला खालील प्रश्न उपस्थित केले आहेत:

  • भेट कोठे घ्यावी?: गावात तलाठी व कोतवाल यांना बसण्यासाठी शासनाने नेमकी कोणती जागा दिली आहे? महिलांना काही काम असल्यास त्यांनी कोठे जावे?

  • कामाचे नियोजन काय?: तलाठी साहेबांच्या कामाचे दिवस कोणते व ते आठवड्यातून किती दिवस गावात उपलब्ध असतात?

  • शासकीय माहिती कशी मिळणार?: शासनाची विविध पत्रके, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या, पीक पेरा नोंद, फार्मर आयडी (Farmer ID) तसेच पीक विम्याबाबतची माहिती कुठे पाहायला व वाचायला मिळणार?

  • लोकप्रतिनिधी गप्प का?: ज्या ग्रामपंचायत सदस्यांना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडून दिले, ते या गंभीर समस्येकडे डोळेझाक का करत आहेत?

कार्यालय तातडीने सुरू करण्याची मागणी

इतर गावांप्रमाणेच बोरगाव (धांदे) येथील तलाठी कार्यालय सुस्थितीत सुरू करून तलाठी व कर्मचाऱ्यांनी याच शासकीय इमारतीमधून कामकाज पाहावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ करत आहेत. महसूल व कृषी विभागाने या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

आता तरी लक्ष द्या!

शासकीय इमारती धूळ खात पाडून नागरिकांना पायपीट करायला लावणाऱ्या अशा भोंगळ कारभारावर कडक कारवाई झाली पाहिजे का?


28
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!