यवतमाळ हादरले! टाकळी तलावात पोहण्यासाठी गेलेले ३ महाविद्यालयीन विद्यार्थी बुडाले; परिसरात हळहळ
यवतमाळ | पोलीसनामा (प्रतिनिधी – अजय उप्पलवार) – शहरालगत असलेल्या टाकळी येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन महाविद्यालयीन तरुण विद्यार्थ्यांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण यवतमाळ शहर व परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, यवतमाळ येथील एका महाविद्यालयात शिकणारे आठ विद्यार्थी फिरण्यासाठी टाकळी तलाव परिसरात गेले होते. सायंकाळच्या सुमारास या आठपैकी पाच विद्यार्थ्यांनी पोहण्यासाठी तलावाच्या पाण्यात प्रवेश केला. मात्र, पाण्याच्या खोलीचा आणि तळाशी असलेल्या गाळाचा अंदाज न आल्याने पाचही जण पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.
दोघांना वाचवण्यात यश; तिघांचा दुर्दैवी अंत
विद्यार्थी पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिक आणि सोबत्यांच्या प्रसंगावधानामुळे दोघांना वेळीच पाण्याबाहेर काढून सुखरूप वाचवण्यात यश आले. मात्र, दुर्दैवाने उर्वरित तिघे खोल पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस प्रशासन आणि स्थानिक बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली. सुमारे दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
मृत विद्यार्थ्यांची नावे:
१. पियुष यादव (वय २१ वर्षे)
२. प्रथमेश यादव (वय १८ वर्षे)
३. प्रसाद सातपुते (वय २१ वर्षे)
प्रशासनाचे नागरिकांना व पालकांना आवाहन
या दुर्दैवी घटनेमुळे पावसाळ्याच्या दिवसांत धरणे, तलाव आणि नद्यांमध्ये पोहण्यासाठी जाण्याच्या धोक्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात पाण्याच्या खोलीचा, प्रवाहाचा आणि गाळाचा अचूक अंदाज येत नसल्याने अशा प्राणघातक दुर्घटना घडतात. त्यामुळे तरुण वर्ग आणि नागरिकांनी कोणत्याही धबधब्यावर किंवा तलावात उतर साहस करू नये, तसेच पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.















