टिपेश्वर अभयारण्य परिसरातील इको – सेन्सीटिव्ह झोनमध्ये (Eco Sensetive Zone) करण्यात येणाऱ्या बेकायदेशीर बांधकाम, रिसॉर्टस, खदानी उत्खनन व वृक्षतोड बाबत पांढरकवडा वनविभागाकडून जिल्हाधिकारी विकास मीना यांचे कडे अहवाल सादर
घाटंजी : पोलीसनामा (अयनुद्दीन सोलंकी) – यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या इको-सेन्सिटिव्ह झोन (Eco-Sensitive Zone) क्षेत्रामध्ये नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत रिसॉर्ट्स, विनापरवाना बांधकामे, वृक्षतोड आणि खदान उत्खननाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारी आणि वृत्तपत्रांतील बातम्यांची दखल घेत वनविभागाने या भागातील रिसॉर्ट्सची सखोल चौकशी व मोजमाप सुरू केले आहे.
पांढरकवडा येथील उपवनसंरक्षक यशवंत बहाळे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर चौकशी अहवाल यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे सादर केला आहे. दरम्यान, बहुतांश रिसॉर्ट मालकांनी जिल्हा मॉनिटरिंग (जिल्हाधिकारी) कमिटीकडे रीतसर प्रस्ताव सादर न केल्यामुळे संबंधित रिसॉर्ट चालकांमध्ये धाकधुक वाढली आहे.
७ दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे कडक निर्देश!
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, रिसॉर्ट परवानगी संदर्भात सर्व कायदेशीर कागदपत्रे वनविभागाच्या कार्यालयात जमा करण्याचे निर्देश १६ मार्च २०२६ रोजीच देण्यात आले होते. परंतु, अद्यापही काही रिसॉर्ट्सची कागदपत्रे सादर करण्यात आलेली नव्हती.
यावर कडक पाऊल उचलत सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) उदय आव्हाड यांनी संबंधित अधिकार्यांना ७ दिवसांच्या आत टिपेश्वर अभयारण्य विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) कार्यालयात सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे अंतिम आदेश दिले आहेत.
परवानगी प्रलंबित किंवा नसलेल्या ‘त्या’ रिसॉर्ट्स आणि बांधकामांची यादी (तपशील):
वनविभागाच्या अधिकृत अहवालानुसार, जिल्हा मॉनिटरिंग कमिटीची बांधकाम परवानगी न घेता किंवा प्रस्ताव प्रलंबित असताना खालील व्यावसायिक बांधकामे उभी राहिली आहेत:
-
अवनी रिसोर्ट (भुतली रिअल इस्टेट LLP) : मौजा सुन्ना येथील गट क्र. १५१/१+ब, १ ते ५ मध्ये १६६५ क्षेत्राचे बांधकाम केले. कमिटीने फक्त जमीन अकृषक (NA) करण्यास परवानगी दिली होती, बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.
-
अटेम्बपाव आकृषी असरी (अल्लुरी विष्णूवर्मा गोपाकृष्ण) : मौजा सुन्ना येथील गट क्र. १५१/२/१ मध्ये १८८१ चौरस मीटरचे बांधकाम, बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव कमिटीकडे प्राप्त झालेला नाही.
-
ओम आनंद कृषी पर्यटन (प्रवीण बोळकंटवार) : मौजा सुन्ना येथील गट क्र. १५२/२ मध्ये ३६८ चौरस मीटरचे बांधकाम, कोणत्याही प्रकारच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर केलेला नाही.
-
जंगली बगीचा (संजीव कुमार गुप्ता) : मौजा सुन्ना येथील गट क्र. १५२/२ मध्ये ५८४ चौरस मीटरचे बांधकाम, कोणत्याही प्रकारच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर केलेला नाही.
-
रोअर कृषी पर्यटन (हरिओम कन्नामे) : मौजा सुन्ना येथील गट क्र. १५५/२अ मध्ये २३२ चौरस मीटरचे बांधकाम, कोणताही प्रस्ताव कमिटीकडे सादर करण्यात आलेला नाही.
-
सुरभार कृषी पर्यटन (देविदास मगनानी) : मौजा सुन्ना येथील गट क्र. १५५/२ब मध्ये ७१९ चौरस मीटरचे बांधकाम, सदर प्रस्ताव अकृषक करणे हेतू मॉनिटरिंग कमिटीच्या परवानगीसाठी सादर करण्यात आला आहे.
-
वृंदावन कृषी पर्यटन (सुनील कुंचनवार) : मौजा सुन्ना येथील गट क्र. ३४/२ मध्ये ८८५ चौरस मीटरचे बांधकाम, कोणताही प्रस्ताव परवानगीसाठी सादर करण्यात आलेला नाही.
-
स्टर्लिंग टिपेश्वर रिसोर्ट (टि. व्ही. एन. राव) : मौजा सुन्ना येथील गट क्र. १३२ मध्ये १२८४ चौरस मीटरचे बांधकाम. या जागेवर वाणिज्य (रिसॉर्टकरिता) काही अटींवर परवानगी देण्यात आलेली आहे.
-
जंगल वाईब्स कृषी पर्यटन (राहुल तापस) : मौजा रुढा येथील गट क्र. ५२ मध्ये ७४० चौरस मीटरचे बांधकाम, कोणत्याही प्रकारच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला नाही.
-
बोन्स फार्म हाउस कृषी पर्यटन (मुथुनुरी राकेशकुमार राजू) : मौजा सुकळी येथील गट क्र. ५६ मध्ये १०३२ चौरस मीटरचे बांधकाम, कोणत्याही प्रकारच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला नाही.
-
टिपाई रिसोर्ट (रोहित जोशी) : मौजा गोंडवाकडी येथील गट क्र. ४२ व ४३ मध्ये ४४० चौरस मीटरचे बांधकाम. प्रस्तावावर अंतिम निर्णय अद्यापही झालेला नाही. नगर रचना यवतमाळ यांच्या मते यातील जास्तीत जास्त बांधकाम डिसेंबर २०१७ पूर्वीचे आहे.
-
टाइगर टेल इको रिसोर्ट (भवदीया रिंकल) : मौजा सुन्ना येथील गट क्र. ८१/२/१ मध्ये ७३३ चौरस मीटर बांधकाम, केवळ महसूल विभागाकडून अकृषक (NA) परवानगी मिळाल्याचे समजते.
-
टिपाई ऍग्रो टुरिझम होम स्टे (सचिन कापसे) : मौजा कालेश्वर येथील गट क्र. २/२ मध्ये ५६०८ चौरस फुटाचे बांधकाम, कोणताही प्रस्ताव कमिटीकडे सादर करण्यात आलेला नाही.
-
पावस कृषी पर्यटन केंद्र (खेत्रीबाई सोनेराव शेдमाके) : मौजा कालेश्वर येथील गट क्र. ७ मध्ये ५०४२ चौरस फुटाचे बांधकाम, कोणताही प्रस्ताव कमिटीकडे सादर करण्यात आला नाही.
-
निलगाय होम स्टे (मारोती कोटनाके, भाडे तत्त्वावर आशिष पुराणिक व सुनील सर) : मौजा कालेश्वर येथील गट क्र. ४१ मध्ये ४५० चौरस फुटाचे बांधकाम, कमिटीकडे कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आला नाही.
-
शिवराई ऍग्रो टुरिझम (राणी विलास मेश्राम) : मौजा कालेश्वर येथील गट क्र. ५ मध्ये ४२२३ चौरस फुटाचे बांधकाम, कोणत्याही परवानगीसाठी कमिटीकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला नाही.
-
माया फार्म स्टे (हेमंत राजपूत) : मौजा जांब येथील गट क्र. ७/१ मध्ये ३८४८ चौरस फुटाचे बांधकाम, कोणताही प्रस्ताव जिल्हा मॉनिटरिंग कमिटीकडे सादर करण्यात आलेला नाही.
पुढील कारवाईसाठी अहवाल रवाना
टिपेश्वर अभयारण्यालगत मौजा सुन्ना, वाऱ्हा, गोंडवाकडी, चनाखा, मराठवाकडी, टेंभी येथील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात रिसॉर्ट आणि पर्यटन केंद्रांसाठी मॉनिटरिंग कमिटीकडे प्रस्ताव दाखल करण्यात आल्याची अधिकृत माहिती पांढरकवडा वनविभागाकडून प्राप्त झाली आहे.
या अहवालाच्या प्रतिलीपी पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी विभागीय वनअधिकारी वन्यजीव विभाग पांढरकवडा, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यवतमाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी पांढरकवडा, पारवा व जामणी यांना पाठवण्यात आल्या आहेत. आता वनविभागाच्या या सविस्तर अहवालानंतर जिल्हाधिकारी विकास मीना अनधिकृत बांधकामे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर काय कायदेशीर पावले उचलतात, याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागले आहे.
ब्युरो रिपोर्ट, पोलीसनामा न्यूज, यवतमाळ/घाटंजी.















